“शिंदेंचे ४० आमदार आम्हाला फोन करतायतं!, आमचं चुकलं”

शिंदेंचेच १०-१२ आमदार आमच्या संपर्कात : चंद्रकात खैरे

औरंगाबाद,२९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातील दोन आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा केल्यानंतर खैरेंनी आमच्याही संपर्कात १०-१२ आमदार आहेत, अशी प्रतिक्रीया दिली आहे. “संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, मी सुरूवातीपासून त्यांना सांभाळलं आहे. नशीबाने ते आमदार झाले आहेत. त्यामुळे आमच्या संपर्कात दोन आमदार आहेत असं बोलणं चुकीचं आहे. उलट शिंदे गटातीलच १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत.”, असा दावाही त्यांनी केला आहे.

शिवसेनेतील ४० आमदारांनी उठाव करत फडणवीस-शिंदे सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेतून ठाकरे गट हा वेगळा झाला आहे. खासदारांनीही शिंदे यांच्याच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. शिवसेनेतून या आमदारांवर कठोर टीका केली जात आहे. त्यातच आता दोन आमदार शिंदेंना समर्थन देणार असल्याच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाची चिंता वाढू लागली आहे. या प्रकरणात उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी “शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, त्यातील 10-12 आमदार शिवसेनेत परत येणार आहेत. असा दावा केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे समर्थक दोन आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी हे उत्तर दिलं आहे. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे ४० आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले १०-१२ आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं.