दसरा मेळावा शिवतीर्थावरच, कोणताही संभ्रम नाही : उद्धव ठाकरे

मुंबई ,२९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मुंबई महापालिकेनं अजूनही शिवर्तीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय घेतला नसला तरी शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ज्यांना संभ्रम करायचा त्यांना करू दे असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी देण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. मात्र महाराष्ट्रात उलटं घडतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

‘आज संघ परिवारातील लोक सेनेत आलेत. सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. परंतु गद्दाराची माती ही गद्दारांनाच जन्म देते. हिंदुत्व सोडले म्हण-यांना हे उत्तर आहे. मुस्लीम समाजातील लोकही येत आहेत. तिकडं भ्रामक हिंदुत्व दाखवले जात होते. खरे हिंदुत्व आमचाकडे असल्यानं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत.’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:

संघ परिवारातील लोक हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या परिवारात आले आहेत.

मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटते आणि अभिमानही वाटतो, साधारणतः सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी रांग लागते.

आज महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र दिसतेय. महाराष्ट्राची माती मर्दाना जन्म देते गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी ही सगळी मंडळी शिवसेनेत येत आहेत.

भारतीय जनता पक्षाने आम्ही हिंदुत्व सोडले आहे, अशी आवई उठवली होती. त्याला छेद देणारी आजची घटना आहे.

बहुजन, वंचित, मुस्लिम समाज शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. एक वेगळे वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. हे चित्र नक्कीच देशासाठी मार्गदर्शक ठरेल.

खरे हिंदुत्व शिवसेनेकडे आहे, असे ज्यांना वाटते. त्यांनी मातोश्रीकडे यावे. मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार!