वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदीसाठी आ.सतीश चव्हाण घाटीला 50 लाखाचा निधी देणार

औरंगाबाद,२९ एप्रिल /प्रतिनिधी- 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रू. 50 लाखाचा आमदार निधी देण्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.29) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) भेट दिली. घाटीतील सर्व विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, विशेष कार्यअधिकारी डॉ.सुधीर चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.एल.एस.देशमुख, डॉ.ज्योती बजाज, डॉ.प्रभा खैरे, डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.श्रीनिवास गडप्पा आदींची उपस्थिती होती. रूग्णांवर उपचार करताना कोण कोणत्या अडचणी येतात, उपचारासाठी कोणकोणती उपकरणे उपलब्ध आहेत, कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, मनुष्यबळाची सद्य परिस्थिती कशी आहे आदींचा आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी आढावा घेतला. घाटीत कोविडची गंभीर असलेली रूग्ण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. या रूग्णांकरिता विविध यंत्रसामुग्री व इतर उपकरणे यांची आवश्यकता असते. मात्र सद्या घाटीत उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व इतर उपकरणे हे रूग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे उपचाराकरिता कमी पडत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांच्या निदर्शनास आले.

          कोवीड-19 विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. घाटीत सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रसामुग्री कमी पडत असल्याने यातील 50 लक्ष रू. निधी मी घाटी प्रशासनाला देणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले. मागच्या वर्षी देखील कोरोनाच्या संकट काळात आ.सतीश चव्हाण यांनी घाटीला वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी 10 लाखाचा आमदार निधी उपलब्ध करून दिला होता.

चौकट- घाटीत आज झालेल्या बैठकीत रेमडेसिविर आजपर्यंतच पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचे घाटी प्रशासनाने आ.सतीश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. आ.सतीश चव्हाण यांनी लागलीच आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे यांच्याशी फोनव्दारे संपर्क करून आजच्या आज रेमडेसिविर इंजेक्शन घाटीला उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार सायंकाळी घाटी प्रशासनाला रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त देखील झाली.