“…तर माझ्यासह सर्वजण बेळगावला असतील”, शरद पवारांचा बोम्मईंना 48 तासांचा अल्टीमेटम!

बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,६ डिसेंबर​ ​/ प्रतिनिधी :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारचे वागणे आणि वक्तव्यांमुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला झाला असून महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासांत कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील आणि मराठी भाषिक लोकांवर हल्ले करणे आणि त्रास देणे थांबवले नाही तर परिस्थिती आणखीनच वाढू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.आज सर्वांशी बोलण्याचा प्रश्न आला त्याचे मुख्य कारण हे सीमा भागात जे काही घडतयं ते पाहिल्यानंतर काही भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मी आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने देशाला ज्यांनी संविधान दिले व त्या संविधानात सर्व भाषिक लोकांना समान अधिकार दिले अशा थोर महामानवाचे स्मरण करण्याचा दिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणाच्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जे घडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे, असे पवार म्हणाले.

यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण काही आठवड्यापूर्वीपासून एका वेगळ्या स्वरूपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी अलीकडे २३ नोव्हेंबरला जतच्यासंबंधी भूमिका मांडली, २४ नोव्हेंबरला अक्कलकोटसंबंधी भूमिका मांडली, त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही अशी टीका त्यांनी केली. त्याशिवाय आणखी गोष्टी आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारची भाषा सातत्याने केली आहे या पार्श्वभूमीवर सीमा भागामध्ये स्थिती गंभीर बनली आहे. माझा स्वत:चा या सीमाभागातील प्रश्नांशी अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. मला यासाठी सत्याग्रह करावा लागला, लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले, अटकपूर्व भूमिकेला तोंड द्यावे लागले. या सर्व गोष्टीचा अभ्यास माझा अनेक वर्षाचा आहे. त्यामुळे सातत्याने ज्यावेळी सीमाभागात काही घडतं तेव्हा कटाक्षाने त्या भागातील अनेक घटक माझ्याशी संपर्क साधतात. मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मिळालेली माहिती अतिशय चिंताजनक आहे, असे पवार यांनी सांगितले.

अपेक्षा होती की असे चित्र घडत असताना कोणीतरी पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकशी संपर्क साधला अशी माहिती त्यांनी स्वत: सांगितली. मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. विषेशत: आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले त्यामुळे एकप्रकारचे भीतीचे वातावरण त्या परिसरात निर्माण झाले आहे. हे वेळीच थांबले नाही तर जी संयमाची भूमिका महाराष्ट्रातून येते ती अजूनही घेण्याची तयारी आहे पण त्या संयमाला सुद्धा मर्यादा असतात. येत्या २४ तासामध्ये या वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर या संयमाला एक वेगळा रस्ता पाहण्याची स्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी ही कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकार यांच्यावर पूर्णपणाने राहणार आहे, असा थेट इशारा पवार यांनी यावेळी दिला.

बोम्मईच्या वक्तव्यांमुळे सीमाभागातली परिस्थीती गंभीर झाली आहे. बेळगावमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या स्मरणाच्या दिवशी सीमेवर घडलेला हा प्रकार निषेधार्ह असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन काहीच फायदा झाला नाही.  दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंमुळे परिस्थिती चिघळल्याचं पवार यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. 

शरद पवारांच्या अल्टीमेटमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर!

राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका मांडली.  शरद पवारांना बेगळावात जाण्याची गरज पडणार नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस  यांनी त्यांच्या 48 तासांच्या अल्टीमेटमला प्रत्युत्तर दिले आहे.

सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शरद पवार  यांना बेळगामध्ये जाण्याची गरज पडणार नाही,  हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

आपल्या संविधानाने प्रत्येकाला कोणत्याही राज्यामध्ये जाण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्य सरकारने रोखलं पाहिजे. जर असं लक्षात आलं की हे राज्य सरकार रोखत नाही तर निश्चित हे केंद्रापर्यंत न्यावं लागेल. महाराष्ट्र हा न्यायप्रियतेसाठी ओळखला जातो त्यामुळे कोणी काही करत असेल तर पोलीस त्यांनी रोखतील, असं फडणवीसांनी सांगितलं. 

सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला?सीमाप्रश्नावरून भाजपाचा ठाकरेंना सवाल

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून 17 डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याने महाराष्ट्राला संकटांच्या खाईत ढकलणाऱ्या ठाकरेंना आता सीमावादावर कंठ फुटला असला तरी सत्तेत असताना याच प्रश्नावर अंग झटकून वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी केली तेव्हा हे उसने अवसान कोठे गेले होते, असा सवालही श्री. उपाध्ये यांनी केला.

सीमाप्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे अशी पोकळ गर्जना उद्धव ठाकरे यांनी केल्याच्या आज प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या हास्यास्पद असून सत्तेत असताना ज्यांनी हा वाद केंद्रावर ढकलला ते आता फुशारक्यांपलीकडे काय करणार असा टोलाही श्री. उपाध्ये यांनी हाणला. “महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भागाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा जो निकाल येईल तो स्वीकारू, पण तोवर हा भाग केंद्रशासित करावा” अशी मागणी ठाकरे यांनी केली होती, या माहितीकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले. सत्तेत असताना सतत केंद्र सरकारकडे हात पसरणारे, प्रत्येक प्रश्न केंद्राकडे ढकलून रडगाणे गाणारे आणि प्रत्येक जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणारे ठाकरे आता सत्ता गेल्यावर आणि पक्ष संपल्यावर उसने अवसान आणून पोकळ वक्तव्ये करत सुटले आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी दर्पोक्ती २०२१ मध्ये करणाऱ्या ठाकरेंचा सूर सत्तेवर येताच बदलला, आणि नाकर्तेपणाची जाणीव झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी वादग्रस्त भाग केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करून पाहिला. मुख्यमंत्री असूनही कोणतीच जबाबदारी न घेता, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या असे जनतेला सांगणाऱ्या ठाकरे यांनी सीमावादातून पळ काढला होता, आणि आता सत्ता, पक्ष काहीच हाती नसताना पुन्हा तोंड उघडले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच असे प्रकार घडतात, असेही श्री. उपाध्ये म्हणाले.

येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. अधिवेशन नागपुरात असताना मोर्चा मुंबईत काढण्याचे आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी ठाकरेंच्या उरल्यासुरल्या पक्षावर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसतो. आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असलेले ठाकरे महामोर्चा काढायला निघाले हाच मोठा विनोद आहे, असेही ते म्हणाले. सत्तेवर असताना महाराष्ट्राचे हित साधणे जमले नाहीच, आता विरोधात बसून राज्याचे अहित तरी करू नका, असा टोलाही श्री. उपाध्ये यांनी लगावला.

१७ डिसेंबरचा मोर्चा हा वैफल्यग्रस्तांचा असल्याची खोचक टिप्पणी श्री. उपाध्ये यांनी केली. मोर्चा काढण्याआधी महाराष्ट्राचा अपमान करणा-या तत्कालिन सरकारमधील घटक पक्षांनी काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान श्री. उपाध्ये यांनी दिले. सत्तेत असताना महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होत असताना, अन्य राज्ये बळीराजाला मदत करीत असताना  शेतक-यांना एक पैशाचीही मदत न करताना, धनदांडग्यांना, मद्य विक्रेत्यांना सवलत देताना महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्याचा खुलासा करा असे श्री. उपाध्ये यांनी ठणकावून सांगितले.

सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांवर जे हल्ले केले, या हल्ल्यांमागे पाठीमागून फूस लावण्याचे काम काँग्रेस व जेडीएस करत असल्याचा घणाघात श्री. उपाध्ये यांनी केला.