दोन हजारांची लाच स्वीकारताना वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक कवटकर गजाआड

वैजापूर,२९ऑगस्ट  /प्रतिनिधी :-जमिनीची हद्दकायम मोजणी करून मोजणी नकाशा देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक संजीत उत्तमराव कवटकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या जमिनीची हद्दकायम मोजणी करून मोजणी नकाशा देण्यासाठी वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक संजीत उत्तमराव कवटकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यापूर्वी तीन हजार रुपये दिले होते व उर्वरित चार हजार रुपयांसाठी कवटकर याने तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता त्यामुळे तक्रारदार यांनी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. चार हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 2 हजार रुपयांची लाच घेताना भूमापक कवटकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रूपचंद वाघमारे, पोलीस नाईक भीमराज जिवडे, दिगंबर पाठक, विलास चव्हाण, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, अप्पर पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.