केवळ माझ्याकडे सुत्र असावी, भविष्यात सत्तेची जबाबदारी घेणार नाही : शरद पवार

“लवकरच राज्याचा दौरा करणार!”; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पवारांची घोषणा

ठाणे ,२९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- माझे वय आता ८२ झाले असल्याने पंतप्रधान पदाची जबाबदारी मी स्विकारणार नाही, केवळ माझ्याकडे सर्व सुत्रे असावीत. त्यामुळे भविष्यात देशातील सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. अशी स्पष्टोक्ती देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतुन माघार घेतल्याचे दिसुन आले. सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा आढावा बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा कराणार असल्याचे सांगितले.

राज्याच्या राजकारणात ठाणे जिल्हा महत्वाचा असून आगामी राजकारणाच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांचे या जिल्ह्यावर लक्ष आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी शरद पवार ठाण्यात आले होते. आपण राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांचा दौरा करणार असून त्याची सुरुवात ठाण्यापासून केली असल्याचे सुरूवातीलाच पवार यांनी सांगितले . यावेळी माजी मंत्री जितेन्द्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे , दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पवारांनी नेहमी प्रमाणे ईडी, सीबीआय आदी तपासयंत्रणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करून यातील एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याची आवई उठवली. आगामी काळात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत छेडले असता पवारांनी, माझे वय ८२ झालेय …त्यामुळे पंतप्रधान पदासह कसलीही जबाबदारी घेणार नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात सत्तेची कुठलीही जबाबदारी स्विकारणार नाही.मात्र, केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचे काम आपण करणार असुन माझ्याकडे केवळ सर्व सूत्रे असावित. अशी इच्छाही त्यांनी बोलुन दाखवली.

आज राज्याचे आणि देशाचे अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्या हातात देश आणि राज्याची सूत्रं आहेत, ते सर्व एका विचाराचे घटक आहेत. केंद्र सरकारने लोकांना अनेक आश्वासने दिली, मात्र पुढे त्याचे काही झाले नाही. पुढील केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुकीत लोक मतदानातून याची प्रचिती दाखवून देतील, असे पवार म्हणाले.

गुजरात, आसाम सोडले तर अनेक राज्यात बिगर भाजप पक्षांची सत्ता आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्रातदेखील बिगर भाजप पक्षांची सत्ता होती. राज्यांची सत्ता जनतेने भाजपला दिली नव्हती. याचा अर्थ लोकांचं मत त्या पक्षासंबंधी काय होतंय, याची प्रचिती या माध्यमातून येते. त्यामुळे माणसे फोडणे, ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करुन सत्ता काबीज करणे, असे गंभीर चित्र दिसत आहे. बिगर भाजप पक्षांसोबत याविरोधात जनमत तयार करण्याबाबतची चर्चा करणार आहोत, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

दुसऱ्या बाजूला राजकीय पुढाऱ्यांना या ना त्या मार्गाने त्रास देण्याचे काम सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडी, आयटी, सीबीआयच्या ११० वेळा धाडी टाकण्यात आल्या. धाडी टाकण्याचा हा उच्चांक या देशात आधी कधी घडला नव्हता. नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबतही हे घडले. इतर राज्यात देखील अशाचप्रकारे या यंत्रणांचा वापर केला जात आहे. अलीकडे हे नवीन चित्र देशात दिसत आहे, ही सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे, असे शरद पवार म्हणाले.

भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना ‘अच्छे दिन’ची घोषणा दिली होती. त्यानंतर अच्छे दिनचे चित्र नागरिकांना काही दिसले नाही. २०१९ च्या निवडणुकीत अच्छे दिनचे विस्मरण पडून ‘न्यू इंडिया २०२२’ चे स्वप्न दाखवले गेले. आता २०२४ साठी ‘५ ट्रिलियन इकॉनॉमी’ करु असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांनी पत्रकार परिषदेत केली.

शरद पवार काय म्हणाले ?

२०२२ पर्यंत शंभर टक्के डिजिटल लिटरसी करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र केवळ ३३ टक्के डिजिटल लिटरसी झाली आहे. शंभर टक्क्यांचे आश्वासन फोल ठरले. २०२२ पर्यंत या देशात प्रत्येक घरी शौचालय देऊ, असेही आश्वासन दिले गेले. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ५६.६ टक्के लोकांकडे शौचालय नाही. ओरिसामध्ये ४० टक्के लोकांकडे शौचालय नाही. देश म्हणून विचार केल्यास सरासरी ३० टक्के लोकांकडे आजही शौचालय नाही.२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे घर असेल, असेही आश्वासन देण्यात आले होते. यासंबंधीचा प्रश्न संसदेत विचारला गेला होता. ५८ लाख घरे संबंध देशात बांधण्यात आली आहेत. याचा अर्थ लोकसंख्येच्या तुलनेत ३० टक्के लोकांनाही घरे मिळालेली नाहीत. प्रत्येक भारतीयाला २०२२ पर्यंत पिण्याचे पाणी मिळेल, असेही सांगण्यात आले होते. पण आता सांगितले जात आहे की २०२४ पर्यंत हा कार्यक्रम लांबविण्यात आला आहे. याचा अर्थ हे देखील आश्वासन पाळण्यात आलेले नाही.तसेच २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला आठवड्यातले ७ दिवस २४ तास वीज पुरवली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. संसदेत हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. ६६ टक्के लोकांकडेच आज विजेची व्यवस्था आहे. ४४ टक्के लोकांना अद्यापही वीज प्राप्त झालेली नाही. २०१८ पर्यंत देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन देऊ, असे आश्वासन दिले होते. अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये २०१९ पर्यंत पोहचायचा प्रयत्न करु, पण अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. २०२२ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आता २०२५ पर्यंत पूर्ण करु.