विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची सदिच्छा भेट

औरंगाबाद,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- औरंगाबादचे जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री.अंबादासजी दानवे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाली. या निवडीनंतर वि.प.नेते अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले. 

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड केली याचा आम्हाला खूप आनंद झाला असून या निवडीमुळे मराठवाड्यासोबतच राज्यातील पक्षाबरोबरच शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी बळ  मिळाले आहे. शिवसेनेला याचा नक्कीच फायदा होईल असे गौरवद्गार काढले.

May be an image of 2 people and people standing

दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. त्यानंतर खैरेंनी त्यांना पेढा भरवला. यामुळे शिवसेनेत राहूनही त्यांच्यात असलेल्या अंतर्गत संघर्षावर तूर्तास पडदा पडला आहे.शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची आणि पक्षातीलच आमदार अंबादास दानवे यांच्यातील बेबनाव सर्वश्रूत आहे. त्यांचे एकमेकांशी असलेला दुरावा अनेकदा जाहीर दिसूनही आला. याबाबत खुद्द चंद्रकांत खैरे यांनीही स्पष्टोक्ती दिलेली आहे. तरीही आज शिवसेनेच्या खडतर आणि संघर्षाच्या काळात त्यांच्यातील दिलजमाई महत्त्वाची मानली जात आहे.

पाच बंडखोरांना आडवे करू

खैरे म्हणाले, अंबादास दानवेंवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकला. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. हा पक्षाचा आदेश आहे आणि तो मी पालन करीत आहे हे माझे कामच आहे. आज ते माझ्याकडे आशिर्वाद घेण्यासाठी आले. औरंगाबादेत आम्ही दोघे शिवसेनेत सक्षम आहोत, आम्ही पाच बंडखोरांनाही आडवे करू.


त्याचप्रमाणे वि.प.नेता अंबादास दानवे यांनी शहरातील शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, शहर संघटक राजू वैद्य, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात जोरदार उत्साहात घोषणाबाजी करून  स्वागत करण्यात आले.सर्वसामान्य शिवसैनिकाची महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, विविध उपक्रमाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या वतीने दानवे साहेबांची वही तुला, लाडू तुला करण्यात आली. 

यावेळी वि.प.नेता आमदार दानवे यांनी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारातून, शिकवणीतून संघर्ष करून तयार झालेली संघटना आहे, येणाऱ्या काळात सर्वांना मिळून ताकदीने शिवसेना पुढे घेऊन जायची आहे, आता डगमगायचे नाही, जनतेची सेवा करत असतानाच शिवसेना संघटना अजून मजबूत करण्याचे आव्हान दानवे यांनी केले.