ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेम, पण शिरसाट कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम

औरंगाबाद,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राजकारणात सगळ्यांनाच पुढे जायचे असते. त्यामुळे मंत्री व्हावे, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे, ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासोबच राहणार असल्याचेही शिरसाट म्हणाले. काल गेलेली पोस्ट चुकून गेली होती. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती पोस्ट गेल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला.

काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केले होते. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतच विधानसभेतले उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील त्यांनी जोडले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. मंत्रीपद मिळाले नसल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले.