संजय शिरसाटांचे दबावतंत्र ?: आमदाराने केलेल्या या ट्विटमुळं शिंदे गटात खळबळ

औरंगाबाद,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदाराने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांचा विधानभवनातील एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे हे आमदार पुन्हा शिवसेनेत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा हा जुना व्हीडिओ ट्विट केलाय. या ट्विटमध्ये आमदार शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेखही केला आहे. मंत्रिपद न दिल्याने संजय शिरसाठ नाराज असून हा व्हिडिओ ट्विट केलाय. त्यामुळे आणखी संभ्रम वाढलाय. त्यांच्या ट्विटमुळं शिंदे गटात खळबळ माजलीय.शिंदे सरकारचा अवघ्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे शिरसाठ दबावतंत्राचा वापर करत असल्याचंही म्हटलं जात आहे.

संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर शिरसाठ नाराज असल्याच्या बातम्या येत असताना आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात वापस जाण्याचा मार्ग अजूनही आहे असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे, येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात जर समावेश झाला नाही तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत हेच दाखवण्याचा प्रयन्त यातून करण्यात आला आहे.मात्र, हे लक्षात येताच ट्विट डिलीट करण्यात आले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.

काय म्हणाले शिरसाट
मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपले मानले तर त्याच्यासाठी मान कापली गेली तर हरकत नाही. एकनाथ शिंदे जे भूमिका घेतील ती भूमिका मान्य असेल, असे संजय शिरसाट म्हणाले. मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी, भूमिका बदलणे तुमच्या हातात नसेल. शिंदे यांनी जी भूमिका घेतलीय त्यामुळे 40 आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची आत्महत्या ठरली असती. आम्ही शिवसेना म्हणून बाहेर पडलो, असून आम्ही शिवसेना काम करतोय, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपण मंत्रीपदासाठी दबावतंत्र वापरत नसल्याचे स्पष्ट करून देण्याचा आणि सारवा सारव करण्याचा प्रयन्त केला आहे.

आम्ही ज्यावेळी शिवसेनेत काम करत होतो. आम्ही आजही शिवसेनेत काम करतो. उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते. एकनाथ शिंदे आता आमचे कुटुंबप्रमुख आहेत. उद्धव ठाकरेंशी मतभेद असले तरी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली आहे. उद्धव ठाकरे काही काळ आमचे कुटुंबप्रमुख होते. उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती, आमचा त्याला विरोध होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको, असं आमची भूमिका आहे. भूमिका पटत नाही मात्र नातं तोडलेलं नाही, आम्ही दूर गेलो नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.