वैजापूर तालुक्यातील नालेगांव येथे गांजाच्या शेतीवर छापा, 10 लाख रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वैजापूर ,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नालेगांव शिवारातील शेतावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.14)  छापा टाकून 9 लाख 42 हजार रुपये किमतीची गांजाची 303 झाडे जप्त केली. याप्रकरणी शेतमालकाविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालेगांव शिवारातील शेत गटनंबर 162 मधील तुरीच्या शेतामध्ये गांजाची लागवड  करून त्याचे संवर्धन व जोपासना करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावरून औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या शेतावर छापा टाकला असता तुरीच्या शेतात लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.शेतमालक रंजित महाजन सुंदर्डे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पोलिसांनी शेतातील गांजाची झाडे जमिनीतून उपटून त्याची मोजणी केली असता 9 लाख 42 हजार रुपये किंमतीची 157 किलो वजनाची 303 झाडे मिळून आली. पंचनामा करून ही झाडे जप्त करण्यात आली.

औरंगाबाद जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निमित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव,सहाय्यक फौजदार सय्यद झिया,पो.हे.का.सुनील खरात, वाल्मिक निकम,नरेंद्र खंदारे,अखतर शेख,ज्ञानेश्वर मेटे, शिऊर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागटिळक  यांच्या पथकाने ही कारवाई केली.