भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव:औरंगाबाद विभागासाठी 6 लाख 2 हजार राष्ट्रध्वजांचे वितरण

औरंगाबाद,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- औरंगाबाद विभागात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत औरंगाबाद विभागातील सहा जिल्ह्यात 6 लाख 2 हजार राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, तर औरंगाबाद, परभणी व नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर निविदा काढून राष्ट्रध्वज उपलब्ध करुन घेतले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

            जालना जिल्ह्यासाठी 1 लाख 11 हजार, बीड जिल्ह्यासाठी 1 लाख 95 हजार, लातूर जिल्ह्यासाठी 1 लाख 54 हजार, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 36 हजार, हिंगोली जिल्ह्यासाठी 1 लाख 6 हजार असे एकूण पाच जिल्ह्यांसाठी 6 लाख 2 हजार राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात आले आहे.

24 तास फडकणार तिरंगा

भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर, 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज घरावर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये घरावर राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान  13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहेत.