‘ फ्रीडम ज्वाइन रॅली’ मध्ये ललित कला संकुलाचा सहभाग:पथनाट्य आणि देशभक्तीपर गीतांनी वेधले नांदेडकरांचे लक्ष

नांदेड ,१२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ ‘घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित फ्रीडम जॉईन रॅलीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी  कला संकुलातील विद्यार्थ्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला व देशभक्तीपर गीतांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अनुराधा ढालकरी, विकास माने, किरण आंबेकर, स्नेहलता स्वामी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

विद्यापीठाच्या ललित व  प्रयोगजिवी कला संकुलातील विद्यार्थ्यांनी संचालक डॉ. पृथ्वीराज तौर आणि नाट्यशास्त्र विभागाच्या डॉ. अनुराधा जोशी पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घर घर तिरंगा’ या विषयावर पथनाट्याचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. अभियान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पथनाट्यातून करण्यात आला. लोकांच्या मनातील प्रश्नांना संवादाच्या माध्यमातून उत्तरे देण्यात आली. पथनाट्याच्या आरंभी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, सारे जहाँ से अच्छा, ए मेरे वतन के लोगो, कर चले हम फिदा इत्यादी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणही केले. राष्ट्रप्रेमाची भावना लोकांमध्ये जागृत करण्यास संकुलाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.  

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महात्मा फुले पुतळा व जिल्हा क्रीडा संकुल इत्यादी ठिकाणी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली. 

डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. अनुराधा जोशी पत्की, डॉ. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपीलवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत तोरणे, विजय गजभारे, सिद्धांत दिग्रसकर, वैष्णवी इंगळे, प्रांजली मोतीपवळे, रागिणी कुरुंदकर, मनीषा उंबरेकर, महेश चिंतनपल्ले, अनिल दुधाटे, मनोज कदम, शुभम कांबळे, गजानन गोंधळी, गणेश महाजन, गायत्री गोदरे, दिपाली शिंदे, आकांक्षा मोतेवार या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून रॅलीची शोभा वाढवली. 

विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. घनश्याम येळणे, डॉ. बाबूराव जाधव, डॉ. शिवराज शिंदे, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. कैलास पोपुलवाड, प्रा. बालाजी चिरडे, प्रा. हनुमंत भोपाळे  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.