जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना

मुंबई ,९ मार्च / प्रतिनिधी :-जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक झाली.

या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील रेणापूर प्रकल्प, पिंपळढव साठवण तलाव, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीचे काम, पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रकल्पांचा भाग म्हणून मान्यता देणे, लेंडी प्रकल्पाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा शासन निर्णय निर्गमित करणे, बाभळी बंधारा गेटच्या संचलनाबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करणे व जलसंपदा विभागाच्या जागा शासकीय कामासाठी हस्तांतर करण्यासाठी मंजुरी देणे, अशा विविध कामांबाबत विस्तृत चर्चा झाली. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रकल्प कालमर्यादेत सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव जवळगावकर, आमदार शामसुंदर शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सहसचिव अतुल कपोले, सहसचिव र. रा. शुक्ला, उपसचिव वैजनाथ चिल्ले, जया पोतदार, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, औरंगाबाद मुख्य अभियंता जयंत गवळी आदी उपस्थित होते.