अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय– महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई,३ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा सभात्याग 

अडचणीच्या काळात अंगणवाडी सेविका नेहमीच राज्याच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. आज त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. हजारो अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस वेतनवाढीसाठी आझाद मैदानात संघर्ष करत आहेत. मात्र सरकार त्यांना मदत करत नसून थातुरमातुर उत्तरे देत आहे. यामुळे आम्ही सभात्याग केला असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आ. जयंतराव पाटील यांनी दिली.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असे सांगण्यात आले. यातून या सरकारमध्ये असलेल्या मोजक्या मंत्र्यांना किती अधिकार आहेत ते दिसून येते. येणाऱ्या अर्थसंकल्पात वेतनवाढी बाबत काही ठोस उपाययोजना नसतील त्यामुळेच टोलवाटोलवी केली जात आहे. तातडीने अंगणवाडी सेविकांना १५ हजार आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जयंतराव पाटील यांनी केली.