जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरुवारी ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम

मुंबई,५ एप्रिल  /प्रतिनिधी :- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गेटवे ऑफ इंडिया येथे येत्या गुरुवारी, 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्‍य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. गंभीर आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा Our Planet, Our Health हे घोषवाक्य निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड –19 महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेसमोर उभी राहिलेली आव्हाने, वाढत्या प्रदुषणामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार यांच्याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत बलून फेस्टिवल, ध्यान आणि आहार विषयक व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास मुंबई महानगर पालिका आणि मेड स्केप इंडिया यांचेही सहकार्य लाभत आहे.