दोन अभिनेत्रींची सेक्स रॅकेटमधून सुटका

घोडबंदर येथील वेश्या व्यवसायाचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश

ठाणे : ठाणे पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात हे वेश्या व्यवसाय सुरू होते.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स रॅकेटमधून दोन २५ वर्षीय अभिनेत्रींची ठाणे पोलिसांनी सुटका केली आहे. या अभिनेत्री मराठी आणि हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करत होत्या. याप्रकरणात पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे, ज्याने या दोघींना या सेक्स रॅकेटमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला. तर या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील यांनी या घटनेविषयी माहिती दिली. पोलिसांना नालासोपारा येथील ३० वर्षीय रहिवासी २५ वर्षांच्या दोन अभिनेत्रींना देह व्यापारात जबरदस्तीने ढकलत असल्याची टिप मिळाली होती. या दोन्ही मुली वर्सोवा याठिकाणी राहणाऱ्या होत्या, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

कापूरबावडी याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेचे या प्रकरणाशी थेट कनेक्शन असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. ती या परिसरात सेक्स रॅकेट चालवण्याचे काम करत होती. त्यामुळे पोलिसांनी नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सापळा रचला. या घटनेत तिचा काय हात आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून आमिष दाखवून तिला सापळ्यात अडकवण्यात आले.

‘गुरुवारी रात्री उशिरा घोडबंदर रोडलगतच्या एका फास्ट फूड आउटलेटबाहेर ती या अभिनेत्रींसाठी ग्राहकांकडे विनंती करण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही तिला अटक केली. सुटका करण्यात आलेली एक महिला नेपाळची आहे, तर दुसरी पुण्याची आहे. आरोपींनी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या पैशाचे आश्वासन देऊन त्यांना वेश्याव्यवसायात अडकवले जात होते.’

याआधीही ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात जून २०२१ मध्ये एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एका पुरुष दलालासह पाच जणांना अटक केली होती. चौकशीत या लोकांनी पोलिसांना सांगितले होते की, लॉकडाऊनमध्ये काम मिळाले नाही म्हणून त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केला.