गड-किल्ले संवर्धनाच्या परवानगीसाठी कालमर्यादा ठरविण्याचा नियम विचाराधीन – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई ,९ मार्च / प्रतिनिधी :- गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून सामाजिक उत्तरदायित्वमधून देखील निधी  उपलब्ध होत आहे. या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करताना परवानगी मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी पुरातत्व विभागाला कालमर्यादा ठरवून अशा प्रकारची परवानगी देण्याचा नवा नियम करता येईल का याचा विचार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कांगोरा मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासह गडकिल्ले जतन आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य अनुदान मिळण्याबाबत विधानसभा सदस्य भरतशेठ गोगावले यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी उत्तर दिले. कांगोरी किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून ते भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. कांगोरी गड/मंगळगड संवर्धन समितीने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सर्वांगिण विकासासाठी कांगोरा मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासह गडकिल्ले जतन आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य अनुदान देण्याची विनंती केली आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेस कळविण्यात आले आहे, असेही सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितले.

गड-किल्ल्यांची सुरक्षा करण्यासाठी गृह विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे विचारणा केली असून रायगडाचे विशेष महत्त्व लक्षात घेता त्याठिकाणी विशेष सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या संयुक्त विद्यमाने गड-किल्ल्यांसाठी विशेष योजना राबविण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांनी सांगितले.