महावितरणच्या बक्षीस योजनेत शशांक गोळेगावकर यांना इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस तर रेखा नखाते यांना फ्रीज

औरंगाबाद,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महावितरणने मराठवाड्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी सुरू केलेल्या बक्षीस योजनेची दुसरी सोडत शुक्रवारी (१२ ऑगस्ट) काढण्यात आली. त्यात नांदेडचे शशांक गोळेगावकर हे प्रादेशिक स्तरावरील इलेक्ट्रिक स्कूटरच्या बंपर बक्षिसाचे मानकरी ठरले तर तर  बीडच्या रेखा नखाते यांना रेफ्रिजरेटरचे विशेष बक्षीस मिळाले.      

महावितरणच्या योजनेचे बंपर बक्षीस विजेते बालाजी सोनवळकर यांना इलेक्ट्रिक स्कूटर प्रदान करण्यात आली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे व महावितरणचे इतर अधिकारी. 

मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांना वीजबिले देय दिनांकाच्या आत भरण्याची सवय लागावी यासाठी जूनपासून ही योजना सुरू आहे. या योजनेची दुसरी ऑनलाईन सोडत औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, उपमहाव्यवस्थापक प्रवीण बागूल,अधीक्षक अभियंता उत्क्रांत धायगुडे, संजय सरग, मोहन काळोगे, अर्शदखान पठाण, प्रभारी महाव्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली, प्रणाली विश्लेषक मनीषा निफाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.   

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.गोंदावले म्हणाले की, बक्षीस योजना सुरू केल्यानंतर जूनच्या तुलनेत जुलैमध्ये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या एका लाखाने वाढली आहे. वेळेत व ऑनलाईन वीजबिल भरल्यास विविध सवलती मिळतात. त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा. वेळेवर वीजबिल भरून ग्राहकांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, जेणेकरून ग्राहकांना अधिक सेवा देण्याची प्रेरणा महावितरणला मिळेल.    

परिमंडल पातळीवरील एलईडी टीव्हीचे बक्षीस राम हरपाळे (औरंगाबाद), शिवाजी बिंदू (माजलगाव जि.बीड) व भालेराव (नांदेड) यांना जाहीर झाले. याशिवाय मंडल पातळीवरील ९ मोबाईल विजेत्यांची, विभाग स्तरावरील २२ मिक्सर विजेत्यांची व उपविभाग स्तरावरील एक हजार रुपयांपर्यंतच्या २०२ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. विजेत्या ग्राहकांना घरी जाऊन ही बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सोनवळकर यांना स्कूटर प्रदान

जून महिन्याच्या सोडतीत बंपर बक्षीस मिळवणारे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ग्राहक बालाजी सोनवळकर यांना सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. तसेच जुलैच्या बंपर बक्षिसाची सोडतही त्यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी सोनवळकर यांनी महावितरणने दिलेल्या बक्षिसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इतर घरगुती ग्राहकांनीही वेळेवर वीजबिल भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.