४५ वर्षांवरील नागरिकांनो,लस घेतली तरच घराबाहेर पडण्याची परवानगी

व्यापाऱ्यांनो लस घ्या ,अन्यथा दुकाने उघडण्यास ३० एप्रिलनंतर परवानगी नाही, पालिका प्रशासकांचा इशारा

औरंगाबाद ,१८ एप्रिल / प्रतिनिधी

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांनो  लस घेतली तरच घराबाहेर पडण्याची परवानगी   पालिका देणार आहे.व्यापाऱ्यांना लस घेतली असेल तरच दुकाने सुरु करु देण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे.त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्या वयोगटातील नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी रविवारी (१८ एप्रिल) दिला.

May be an image of 2 people and people standing

आस्तिककुमार पांडेय यांना कोरोना  संसर्ग झाला होता. पंधरा दिवसांपासून ते  गृहविलगीकरणात आहेत. पंधरा दिवसाच्या खंडानंतर त्यांनी रविवारी प्रथमच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरणाची मोहीम आणखी जलद करणे आवश्यक असल्याचे मत पांडेय यांनी व्यक्त केले.

करोना रुग्ण वाढीची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चैन  लागू केले आहे. ३० एप्रिलपर्यंत ब्रेक द चेन ही मोहीम आहे, याचा अर्थ ३० एप्रिलनंतर सर्वकाही सुस्थितीत येईल, को रोना जाईल असे नाही. करोना राहणारच आहे. ब्रेक द चेन मुळे तात्पुरत्या स्वरुपात रुग्ण वाढ थांबेल. रुग्णवाढ पूर्णपणे थांबवायची असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.

सध्या वयवर्ष ४५ आणि त्यावरच्या वयाच्या व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. या वयोगटातील ज्या व्यक्तींनी लस घेतली आहे त्याच व्यक्तींना ३० एप्रिलनंतर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याबद्दल महापालिका गांभीर्याने विचार करीत आहे. . सध्या मास्क न घातलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तशीच कारवाई ३० एप्रिलच्या नंतर लस न घेतलेल्या व्यक्तीवर करण्यचा देखील पालिकेचे प्रशासन विचार करीत आहे. लवकरच या बद्दल निर्णय जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या रोज सरासरी सहा हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. ही संख्या दहा हजारावर नेण्याचे उद्दीष्ट आहे असे पांडेय यांनी सांगितले . औरंगाबादची लोकसंख्या १७ लाख आहे. त्यापैकी ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची संख्या साडेतीन ते चार लाख असण्याची शक्यता आहे. रोज दहा हजार व्यक्तींचे लसीकरण केल्यास तीस दिवसात तीन लाख व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होईल आणि औरंगाबाद कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित परिघात येईल असे वाटते असेही पांडेय म्हणाले. लसीकरणासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात केंद्र सुरु केले आहे. ११५ वॉर्डात ११७ केंद्र आणि खासगी २६ असे १४३ लसीकरण केंद्र आहेत, सोमवारपासून व्यापारीवर्गासाठी ११, बँक अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी १० तर कामगारांसाठी दोन लसीकरण केंद्र सुरु केली जात आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पांडेय यांनी केले.

बाधितांमध्ये महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी होत असल्याचा  दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी रविवारी (१८ एप्रिल) केला.महापालिकेकडे रेमडिसिव्हर इंजक्शनचा साठा आहे, आणखीन दहा हजार इंजक्शनची मागणी नोंदवली आहे हे स्पष्ट करताना पांडेय म्हणाले, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. ऑक्सिजनची कमतरता पडू नये याची खबरदारी महापालिका घेत आहे. त्यासाठी पाचशे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर महापालिका खरेदी करणार आहे. विविध कोविड केअर सेंटरमध्ये मिळून एक हजार खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटर प्रभावी ठरले आहे, आतापर्यंत सात हजारावर रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतला आहे. उपचारासाठी आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे असे पांडेय म्हणाले. आपण स्वत: मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्येच उपचार घेतले असा उल्लेख त्यांनी केला.

May be an image of one or more people, people standing, outerwear and text that says '000 Samsung Triple Camera with my Galaxy A30s'

 करोना प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लस घेतल्यानंतरही करोनाची लागण झाली तरी त्याची तीव्रता कमी असते, माणूस दगावत नाही असे सांगताना पांडेय यांनी स्वत:बरोबरच पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांचे उदाहरण दिले. या सर्वांनी लस घेतली होती म्हणून ते करोनातून लवकर मुक्त झाले अशी माहितीही पांडेय यांनी दिली.