माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन

वैजापुरचे ‘ साहेब ‘ काळाच्या पडद्याआड

औरंगाबाद, १ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जेष्ठ शिवसेना नेते व माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम.वाणी (वय ८४) यांचे बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही दिवसांपासुन त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी रात्री बारा वाजुन ४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, सखाहरी, नगरसेवक सचिन, माजी नगरसेवक लिमेश व देवीदास ही चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. येथील अमरधाम स्मशानभुमीत बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

May be an image of 1 person

तत्पुर्वी येवला रोड येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. अमरधाम स्मशानभुमी येथे जेष्ठ मुलगा सखाहरी यांनी डागाग्नी दिला. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे महसुल मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, साबेर खान, भाऊसाहेब ठोंबरे, अंबादास बनकर, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार उदयसिंह राजपूत (कन्नड), माजी आमदार भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), जिल्हा परिषद सभापती अविनाश गलांडे यांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली.

यावेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, बाबासाहेब जगताप आदींसह सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी लोकनेते दिवंगत आर.एम. वाणी यांचा नगरपालिकेतर्फे शहरात भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत अन्य नेत्यांनी दिवंगत नेत्याचे स्मारक उभारुन त्यांनी केलेले सामाजिक कार्य जतन करावे अशी सुचना केली. 
राजकिय कारकिर्द

माजी आमदार आर.एम.वाणी यांचे राजकिय व्यक्तिमत्व समाजवादी विचारसरणीतुन आकारास आले. शिवसेनेत येण्यापुर्वी त्यांनी कॉग्रेस पक्षाकडुन नगरपालिकेची निवडणुक लढवुन आपल्या राजकिय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.

१९६७ मध्ये लालाबिंदा प्रसाद यांच्या प्रजा समाजवादी पक्षाचे ते सदस्य राहीले. यावर्षी दिवंगत विनायकराव पाटील उर्फ आण्णा यांना वैजापुरमधुन कॉग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर ते कॉग्रेसमध्ये सक्रिय झाले. ते माजी खासदार दिवंगत बाळासाहेब पवार, रामराव नाना पाटील यांचे निकटवर्ती होते. रामराव यांच्यानंतर नगरपालिकेची सुत्रे वाणी यांच्याकडे आली. दिवंगत कचरुशेठ लाडवाणी नगराध्यक्ष असतांना वाणी नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. 

तब्बल ३५ वर्षे नगरपालिकेत सक्रीय असतांना १९८४ ते १९९४ या दहा वर्षात त्यांनी नगराध्यक्षपद भुषवले. या काळात वैजापूर शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न सोडवण्यात त्यांना यश आल्याने त्यांची राजकिय पकड पक्की झाली.

१९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर वाणींची कुशाग्र बुद्धी, कार्यकुशलता व राजकिय दुरदृष्टी हे गुण हेरुन त्यांंना शिवसेनेने पक्षात सामील केले व १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेतर्फे विधानसभेची निवडणुक लढवली. मात्र त्यानंतर त्यांनी मागे वळुन पाहिले नाही. १९९९ ते २००४, २००४ ते २००९ व २००९ ते २०१४ या पंचवार्षिकमध्ये ते सलग तीनवेळा वैजापुरचे आमदार राहिले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आमदार असतांना नांदुरमधमेश्वर जलदगती कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार वाणी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालिन खासदार चंद्रकांत खैरै, नगरसेठ बन्सिलाल संचेती आदींसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सलग ३९ दिवस जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालिन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी आंदोलकांची वैजापूर येथे भेट घेतली. त्यानंतर २००३ मध्ये जलदगती कालव्यात पाणी सोडण्यात आले. या आंदोलनामुळे वाणी यांना नांदुरमधमेश्वर कालव्याचे जनक या उपाधीने संबोधले जात. या प्रकल्पासाठी निधी उपल्बध करुन देण्यात वाणींचा सिंहाचा वाटा होता.

याशिवाय बाजार समितीचे कांदा मार्केट, जलसंधारण अभियानाच्या बक्षिसातुन पंचायत समितीची प्रशासकिय इमारत उभारण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती. प्रशासनावर त्यांचा चांगला वचक होता. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, विधानसभेत तालिका अध्यक्ष, तसेच लोकलेखा, अंदाज, रोजगार, व सदस्य वेतन भत्ता समितीचे सदस्य ही महत्वपुर्ण पदे त्यांनी भुषवली.

आदरांजली

चालते बोलते विद्यापीठ हरवले

“साहेबांच्या निधनाने शिवसेना कार्यकर्त्यांचे चालते बोलते विद्यापीठ हरवले आहे. ते २५ वर्षे माझे राजकिय गुरु होते. त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवणार “

रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर

कार्य कुणीही विसरणार नाही

” वैजापूरला लाभलेल्या प्रगल्भ राजकिय नेत्याचा अस्त ही अत्यंत दुखःदायक घटना आहे. नांदुरमधमेश्वर कालव्यासाठी त्यांनी केलेले कार्य कुणीही विसरणार नाही ”

चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते.

प्रगल्भ राजकिय नेतृत्व हरपले

“नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे वाणी यांचा निकटचा संबंध आला. त्यांची काम करण्याची पद्धत अफाट होती. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याने प्रगल्भ राजकिय नेतृत्व हरपले आहे ” _ अब्दुल सत्तार- महसुलमंत्री

असंख्य कार्यकर्ते जोडले

वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर.एम.वाणी यांचे निधन झाले. सन 1999 ते 2014 असे सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विविध विषयांवर त्यांच्याकडून मला नेहमीच मार्गदर्शन मिळत असे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य असल्याने अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. एक शांत, संयमी, विनम्र व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्व.आर.एम.वाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
-आ.सतीश चव्हाण