महालगाव येथील नियोजित साखर कारखान्याच्या जमीन व परवान्याचा वाद न्यायप्रविष्ट असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी भूमीपूजन

“स्टेटस को” मिळविण्यासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला 

जफर ए.खान

वैजापूर,२९ जुलै :-महालगाव शिवारातील नियोजित श्री.स्वामी समर्थ साखर कारखाना लि. या कारखान्याची जमीन व परवान्याचा वाद न्यायप्रविष्ठ असताना साखर कारखान्याचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी होत आहे. या प्रकरणी “स्टेटस को” मिळविण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेला अर्ज कोर्टाने फेटाळला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधान परिषदेचे माजी आमदार सुभाष माणकचंद  झांबड  (औरंगाबाद) यांनी त्यांच्या नियोजित  झांबड  उद्योग शुगर अँड पॉवर लि.संचलित श्री. स्वामी समर्थ साखर कारखाना लि. या कारखान्यासाठी काही वर्षापूर्वी महालगाव शिवारातील शेत गट नंबर 156 मधील 24 हेक्टर 51आर.जमीन खरेदी केलेली होती. मात्र  झांबड यांनी स्वतः कारखाना सुरू न करता चांदेगांव येथील बाबासाहेब मोहनराव काळे व त्यांचे चिरंजीव  केशवकुमार काळे यांच्याशी जमीन व कारखान्याचा परवाना विक्री करारनामा केलेला आहे. या व्यवहारापोटी श्री.काळे यांनी त्यांना 1 कोटी 23 लाख 14 हजार 999 रुपयांची रक्कम चेकद्वारे दिलेली आहे. करार झाल्यानंतरही  झांबड  यांनी जमीन व कारखान्याचा परवाना श्री.काळे यांच्या नावावर करून दिला नाही. असे श्री.काळे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान श्री. झांबड  यांनी एप्रिल-मे 2022 मध्ये पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर उत्तमराव शिंदे व बाबासाहेब उत्तमराव शिंदे (रा.खुपटी ता.नेवासा) यांना सदरची जमीन कारखान्याच्या परवान्यासह विक्री केली. याप्रकरणी बाबासाहेब काळे यांचे चिरंजीव केशवकुमार बाबासाहेब काळे (प्रो.केशव दूध संकलन केंद्र, श्रीरामपूर) यांनी कारखान्याचा परवाना व जमीन आपल्या हक्कात करून द्यावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ऍड.श्रीमती व्ही.पी.बारजे यांच्यामार्फत त्यांनी वैजापूर न्यायालयात दावा दाखल केलेला असून याप्रकरणी पुढील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान जमीन व कारखान्याच्या परवान्याचा वाद न्यायप्रविष्ठ असताना साखर कारखान्याचे भूमीपूजन 30 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची बातमी “आज दिनांक” व सोशल मीडियावरून कळल्यानंतर श्री.काळे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यावी यासाठी 27 जुलै रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर आज सुनावणी होऊन अर्ज फेटाळण्यात आला आहे.