साखर कारखान्याचे श्रेय आमदारांनी घेऊ नये – शिवसेनेचे निकम व गलांडे यांची पत्रकार परिषद

वैजापूर,२९ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आज भुमीपुजन होत असलेल्या साखर कारखान्याची मान्यता माजी आमदार सुभाष झांबड यांनी 2011मध्ये आणली होती. मात्र वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे हे विनाकारण या कारखान्याचे श्रेय घेत आहेत असा आरोप शिवसेनेचे नेते व शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक संजय निकम व उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.‌

बाजार समितीच्या सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंचगंगा उद्योग समुहातर्फे तालुक्यातील महालगाव येथे बाजाठाण फाटा येथे 30 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियोजित साखर कारखान्याचे भुमीपुजन होणार आहे. या पार्श्वभुमीवर संजय निकम व अविनाश गलांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा कारखाना सुभाष झांबड यांनी पंचगंगा सीड्स कंपनीला काही अटी व शर्तीवर विक्री केला असून पंचगंगा सीड्सचे मालक व त्यांचे सहकारी श्री.स्वामी समर्थ साखर कारखान्याची उभारणी करत आहेत असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील जनतेला माहिती होण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड करावी या हेतुने हे भुमीपुजन ठेवण्यात आले आहे. यात आमदारांचा काडीचाही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या अडीच वर्षांत आमदारांनी मंजुर असलेली औद्योगिक वसाहत सुरु केली नाही. मन्याड साठवण तलावाची उंची वाढवून उपसा सिंचन करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. रामकृष्ण उपसा सिंचन योजनेचे शेतकऱ्यांचे अर्ज माफ करुन योजना चालू करण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसुन येत नाही. नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्याचे नाशिक नगर जिल्ह्याने पळवलेले पाणी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही. शिवसेना भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या पालखेड कालव्याच्या रुंदीकरणाचे श्रेय ते घेत आहेत. शिवसेना भाजपा सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या भगुर – नागमठाण, नागमठाण – कमलपूर, जोडरस्ता हिलालपूर, जोडरस्ता पेंडेफळ आदी रस्त्यांचे श्रेय ते घेत असल्याचा आरोप संजय निकम व अविनाश गलांडे या दोघांनी पत्रकार परिषदेत केला.