खो-खो खेळाच्या विकास आणि प्रसारासाठी सर्वोतोपरी मदत करणार- समीर मुळे

औरंगाबाद, २०जुलै /प्रतिनिधी :- नुकतीच चौथी खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय खो खो स्पर्धा पंचकुला (हरियाणा) येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केले, महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादची मयुरी वसंत पवार हिने लौकिकास्पद खेळ करून राज्याला ‘सुवर्णपदक’ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. औरंगाबाद जिल्ह्याची सुवर्णकन्या मयुरी वसंत पवार हिने वेळोवेळी मिळविलेल्या यशानिमित्त दि औरंगाबाद खो-खो असोसिएशनच्या वतीने तिचा आज सत्कार संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने 27 वर्षानंतर ‘कास्यपदक’ मिळविले, या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडू पूजा अशोक सोळंके व सुजल जाधव या खेळाडूंनीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, त्यांचाही सत्कार यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अँड. गोविंद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.

अँड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो संघ निवड समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला आणि औरंगाबाद येथे एप्रिल महिन्यात खो-खो पंच परीक्षा पार पडली, त्यामध्ये विजय बोबडे, प्रबोधन बनसोडे, राजपाल निकाळजे, वरद कचरे,चेतन गायकवाड, महेश कुंभकर्ण, नवनाथ राठोड, महेश भावसार,  प्रफुल्ल कुलकर्णी, समीर शेख,दत्तू अहिरे, शांभवी पाटील, कल्याणी सोनवणे, पूजा सोळंके, चंचल जाधव-बडदे, तेजस्वी बाहेती, उमेश साबळे, सौरभ गोसावी हे पंच म्हणून उत्तीर्ण झाले, त्यांचाही सत्कार यानिमित्ताने  संघटनेच्या वतीने करण्यात आला.   

यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, विजया शर्मा, औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव अभयकुमार नंदन, मोहन आहिरे, कोषाध्यक्ष श्रीपाद लोहकरे, मनोज गायकवाड, योगेश सोळुंके, सुमंत तांबडे, वसंत पवार, लता पवार आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था जनसंपर्क अधिकारी संजय पाटील उपस्थित होते, कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन संजय बनकर यांनी केले, कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली.