वेळ पडल्यास पंतला उपचारासाठी परदेशात नेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो

डेहराडून :-कार अपघातानंतर भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत धोक्याबाहेर आहे. पण, पंतला बरे करण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. ऋषभवर सध्या डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, बीसीसीआयने त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वेळ पडल्यास पंतला उपचारासाठी परदेशात नेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार अपघातातून बचावलेल्या ऋषभ पंतच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा आहेत. त्यांच्या डोक्याला, कपाळाला, चेहऱ्याला, हाताला, पायाला आणि पाठीला जबर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. तसेच त्याचे एमआयआर करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक पंतच्या गुडघ्याच्या अस्थिबंधनावर उपचार करणार आहे. पंतच्या अपघातानंतर बीसीसीआयचे डॉक्टर डेहराडूनमध्ये मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. मुंबईतील बीसीसीआयचे डॉक्टर त्याच्या गुडघ्याच्या अस्थिबंधांच्या चाचण्या घेतील आणि त्याला कोणत्या पद्धतीने मार लागला हे शोधून काढतील. त्यानंतरच पंतवर मुंबईत उपचार करायचे की परदेशात पाठवायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला खूप दुखापत झाली आहे. त्यामुळे तो संघात कधी पुनरागमन करेल याबाबत काही सांगता येणार नाही.