छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर, धर्मरक्षकच:मंत्री शंभूराज देसाई यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच आहेत, असे प्रत्युत्तर शनिवारी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले.

विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज कधीही धर्मवीर, धर्मरक्षक नसून ते स्वराज्याचे रक्षणकर्ते असल्याचे म्हटले होते. त्याला शंभूराज देसाई यांनी आज जोरदार आक्षेप घेतला.

विधानसभेत गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निष्पापांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांना तुरुंगात धाडा. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल, असा घणाघात करत शिवरायांचा गनिमा कावा कुठला? तुमचा गनिमा कावा कुठला? तुम्हाला मंत्रिपद हवंय. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना कुठं हरबऱ्याच्या झाडावर चढवताय. छत्रपतींचा गनिमी कावा हिंदवी स्वराज्यासाठी होता. तुमचा गनिमी कावा कशासाठी होता? याचाही विचार केला पाहिजे. शिवाय छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर, धर्मरक्षक नसून स्वराज्य रक्षक असल्याचा दावा केला होता.

अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर आज शंभूराज देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला. शंभूराज म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षकच म्हटले पाहिजे. त्यांनी हिंदू धर्मासाठी ४० दिवस अन्यन्य हाल सोसले. अजित पवारांनी भाजप-शिंदे गटाचे नेते काय म्हणतात हे विधानसभेत त्वेषाने मांडले. एका बाजूला सांगायचे थोर पुरुषांचा आदर करा. दुसरीकडे संभाजीराजांना धर्मवीर म्हणू नका म्हणणे हे निषेधार्ह्य आहे. महाराष्ट्रात याचा मोठ्या उद्रेक होईल. कालही, आजही आणि पुढची हजारो वर्षे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील.

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, आम्ही फक्त उत्तर देतोय. बोलणं फक्त तुमच्याकडून सुरू आहे. तुम्ही काहीही म्हणायचं. हे आता होणार नाही. तुम्ही अरे केल्यानंतर त्याला का रे उत्तर देऊ. तुम्ही विकासाबद्दल आणि व्हिजनबद्दल बोला. पॉझिटिव्ह सजेशन दिल्यास सकारात्मक घेऊ. तुम्ही सहा महिन्यांपूर्वीचे उकरून काढत बसता. एकनाथ शिंदे काल म्हणालेत आम्ही शांत आहोत. अन्यथा माझ्याकडची माहिती खूप लांबवर जाणारी आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशारा त्यांनी दिला.

शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, अंधारे ताई या काही सभागृहाच्या सदस्य नाहीत. त्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत गेल्या. असे बोलल्यामुळे त्यांना संधी मिळेल असे वाटत असेल. आमची युती भक्कम आहे. आमच्या बाबतीत ज्यांनी जाणीवपूर्वक, बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केले याचे दूध का दूध का पाणी का पाणी अधिवेशनात झाले. आता अंधारे ताईंनी आमच्यात भांडणे लावायचा प्रयत्न करू नये. त्यातून काहीही साध्य होणार नाही.