जालना जिल्ह्यात 12 व 13 जुलै रोजी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी – आपत्ती व्यवस्थापन मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके

जालना,११ जुलै /प्रतिनिधी :- जालना जिल्हयामध्ये दिनांक 12 जुलै, 2022 रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि दिनांक 13 जुलै, 2022 रोजी मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी इशारा दिला आहे. त्यानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी एका पत्राद्वारे दिला आहे.

विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून वरील तारखेस पडलेल्या पावसाबाबत तसेच काही जिवीत वा वित्त हानी झाल्यास त्याबाबत या कार्यालयास सविस्तर तातडीने नियंत्रण कक्षास कळवावा. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हयातील सर्व शेतकरी व नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी तसेच त्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करून स्वतः सुरक्षीत ठिकाणचा आसरा घेण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. नागरिकांनी जलसाठ्याजवळ जाऊ नये, पुलावरुन पाणी जात असल्यास कोणीही कोणत्याही परिस्थितीत त्यावरून आपले वाहन नेऊ नये, अथवा पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये. विजांचा कडकडाट होत असतांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, कुठल्याही परिस्थितीत उंच झाडांचा आसरा घेऊ नये. तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीची ईशारा देण्यात यावा. सर्व पाटबंधारे विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त यंत्रणेस प्रकल्प स्थळी हजर रहावे. आणिबाणीचा प्रसंग उद्भवल्यास आपणास सतर्क राहण्याचे तथा याबाबत वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या वरीष्ठ कार्यालयांना विनाविलंब कळविण्याचे आदेशीत करण्यात येत आहे. आपत्तीच्या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडु नये अशा सुचनाही पत्राद्वारे निर्गमित करण्यात आल्या आहेत.