‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई,१४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा चित्रपट याच विषयावर आधारित असल्याने तो लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन नंदन, निर्माते कोमल आणि संजोय वाधवा, कलावंत सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर आणि शालेय विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, अनेक समृद्ध देशांमध्ये त्यांच्या मायबोलीचाच वापर केला जातो. भारतात देखील नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. न्यायालयाचे कामकाज मराठीतून व्हावे, यासाठी न्यायालयांनीही पुढाकार घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण हे ओझे वाटू नये आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला जाऊ नये असा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.