अल्पवयीन शालेय मुलीवर बलात्कार :आरोपीस 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

वैजापूर कोर्टाचा निकाल

वैजापूर ,७ जुलै  /प्रतिनिधी :- अल्पवयीन शालेय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर) येथील तरुणास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. आकाश देविदास वाघमारे (वय 20 वर्ष) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे‌. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.मोहिनुद्दिन एम.ए. यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

आकाश देविदास वाघमारे

पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी आहे. 12 फेब्रुवारी 2018 रोजी पीडित मुलीची आई तिला शाळेत सोडण्यास गेली होती. मात्र दुपारी तिला घरी आणण्यासाठी गेली असता मुलगी आढळुन आली नाही. दुसऱ्या दिवशी पिडित मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला फोन वरुन दुपारपर्यंत घरी येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल फोनच्या टॉवर लोकेशनवरुन पिडित मुलीचा शोध घेतला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास साजापूर फाटा येथे पिडित मुलगी ही आरोपी आकाश देविदास वाघमारे यांच्यासोबत मोटारसायकलवर जाताना पिडित मुलीच्या आई व इतरांनी पाहिले. त्यानंतर आरोपी वाघमारे याने पिडित मुलीला रस्त्यावर सोडून तेथून पळ काढला.

पिडित मुलीला पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेतले असता तिने आरोपी आकाश हा शाळेसमोर आला व त्याने वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने सोबत नेऊन तेथील एका गार्डनमध्ये बलात्कार केल्याचे सांगितले. मुलीच्या जबाबानंतर आरोपी आकाश वाघमारे याच्याविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस.डी.तांबे यांनी तपास करुन वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पिडित मुलींसह तिची आई, शाळेचे मुख्याध्यापक, डॉक्टर व पोलिस उपनिरीक्षक यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपी आकाश वाघमारे यास दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरी व कलम 506 खाली एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीची पळवून नेल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. वाळुज पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी काबलिया यांनी सहकार्य केले.