वृध्‍दाला निष्‍काळजीपणे वाहन चालवून धडक देत गंभीर जखमी केल्याप्रकरणी दुचाकीस्वारास एक महिन्याची सक्तमजुरी

औरंगाबाद ,७ जुलै  /प्रतिनिधी :- मुलाला शाळेत सोडण्यासाठी पायी निघालेल्या ५४ वर्षीय वृध्‍दाला निष्‍काळजी पणे वाहन चालवून धडक देत गंभीर जखमी केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्‍यायालयाने ठोठावलेली एक महिन्याची सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.जे. रामग‍डिया यांनी कायम ठेवली. पंडित अंकुशराव नवथर (२५, रा. करंजखेड, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे दुचाकीस्‍वार आरोपीने नाव आहे.
या प्रकरणी महेमुदशहा सांडू शहा (५४, रा. जिन्सी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानुसार, २९ मार्च २०१२ रोजी फिर्यादी हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी पायी निघाले असता, पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने फिर्यादीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेले फिर्यादी खाली रस्त्यावर कोसळले व आरोपी पंडित  नवथर हा पळून गेला.  प्रकरणात फिर्यादीच्या जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपी पंडित नवथर याला दोषी ठरवून भादंवि कलम २७९ अन्‍वये एक महिना सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, कलम ३३७ अन्वये एक महिना सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम १३४ अन्वये एक महिना सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम ही फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशा विरोधात आरोपीने सत्र न्‍यायालयात फौजदारी अपील दाखल केले.

अपीलाच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी आरोपीला प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली शिक्षा कसा योग्य आहे, याचे विवेचन केले. तसेच सर्वोच्‍च आणि उच्च न्‍यायालयांच्‍या न्‍याय निवाड्यांचा दाखला दिला. सुनावणीअंती न्‍यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.