घरासमोर रिक्षा का उभी केली म्हणत जातीवाचाक शिवीगाळ:आई व मुलीला सहा महिने सक्तमजुरी

२५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे आदेश

औरंगाबाद ,६ जुलै  /प्रतिनिधी :-घरासमोर रिक्षा का उभी केली म्हणत जातीवाचाक शिवीगाळ करुन दगडाने मारहाण तसेच रिक्षा तोडफोड करुन नुकसान केल्याप्रकरणी आरोपी पंचकला दिगंबर  मुर्दंगे (काळे) आणि तिची मुलगी आशा दिगंबर मुर्दंगे (काळे) या दोघींना सहा महिने सक्तमजुरी आणि विविध कलामांखाली ४४ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे ठोठाविण्‍यात आलेल्या रक्कमेपैकी २५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात राजु यादवराव गवळी (३७, रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी हे पत्‍नी, आई-वडील, बहिण, भाऊ भावजयी यांच्‍यासह एकत्र रहतात. फिर्यादीने हे किरायाची रिक्षा चालवि‍तात. घटना घडण्‍याच्‍या सुमारे दहा वर्षांपूर्वी फिर्यादीने आंतरजाति‍य विवाह केलेला आहे. दरम्यान फिर्यादीच्‍या घराच्‍या पाठीमागे राहणारे दिगंबर  मुर्दंगे त्‍यांची पत्‍नी पंचकला आणि मुलगी आशा हे नेहमी फिर्यादीच्‍या पत्‍नीला आंतरजातिया विवाह केला म्हणुन हिणवत राहतात. तसेच फिर्यादीच्‍या घरा समोर रिक्षा उभी करायला जागा नसल्याने ते घरा शेजारील मारोती मंदीरालगत असलेल्या सिडकोच्‍या मोकळ्या मैदानात रिक्षा उभी करित होते. मात्र रिक्षा तेथे उभी केल्याने मुर्दंगे कुटुंब  नेहमी फिर्यादीला भांडत होते.

३ जून २०१६ रोजी फिर्यादी हे दुपारी सव्‍वातीन वाजेच्‍या सुमारास जेवण करुन रिक्षाकडे जात असतांना आरोपींनी त्‍याला अडवून जातीवाचक शिवीगाळ सुरु केली. आवाज ऐकूण फिर्यादीचे आई-वडील, पत्‍नी व भावजयी तेथे आला असता आरोपींनी त्‍यांना देखील अर्वाच्‍च भाषेत शिवीगाळ करुन दगड फेकून मारहाण केली. तसेच रिक्षाला देखील दगडाने मारुन रिक्षाचे नुकसान केले. फिर्यादी हे पोलिस ठाण्‍यात तक्रार देण्‍यासाठी येत असताना, मुलीला छेडछाड केल्याची तक्रार देईन अशी धमकी देखील आरोपीने फिर्यादीला दिली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी आई-मुलीला दोषी ठरवून अट्रासिटीच्‍या कलमा अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंड, भादंवी कलम ३२३, ४२७, ५०४ आणि ५०६ अन्‍वये एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी तीन हजार रुपये दंड असा सुमारे ४४ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.