मुख्‍याध्‍यापकाला मारहाण:आरोपी रामदास विश्वनाथ नरवडे याला एक वर्षे कारावास

औरंगाबाद ,६ जुलै  /प्रतिनिधी :-कर्तव्‍यावरील मुख्‍याध्‍यापकाला वर्गात येवून सर्व शिक्षकांसमोर मारहाण करुन शाळेतील दोन रजिस्‍टर फाडणारा आरोपी रामदास विश्वनाथ नरवडे (रा. तोंडोळी ता. पैठण जि. औरंगाबाद) याला एक वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.डी. लोखंडे यांनी बुधवारी दि.६ जुलै रोजी ठोठावली.

प्रकरणात तोंडोळी येथील जिल्हा परिषध प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्‍याध्‍यापक कल्याण विठोबा भानुसे (५५) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २ ऑक्‍टोबर २०१७ रोजी महात्‍मा गांधी जयंती असल्याने शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्‍मा गांधी यांच्‍या फोटोची पुजा करण्‍यात आली. मात्र ग्रामपंचायतीच्‍या निवडणूकीची ड्युटी असल्याने फिर्यादीने ते फोटो भिंतीवर न लावता निघून गेले. परंतु १२ ऑक्‍टोबर २०१७ रोजी सकाळी फिर्यादीहे शाळेत मुलांच्‍या परिक्षा हॉलमध्‍ये कर्तव्‍यावर असतांना गावातील काही लोकांनी कार्यालयात नसतांना मोबाइल मध्‍ये कार्यालयाचे चित्रण केले. १३ ऑक्‍टोबर २०१७ रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे शाळेवर गेले होते, त्‍यावेळी गावातील प्रतिष्‍ठीत लोक शाळेत आले व फिर्यादी व त्‍यांनी फोटोची पुजा करुन हार घालून ते फोटो पुन्‍हा भिंतीवर लावले. सकाळी दहा वाजेच्‍या सुमारास अचानक फिर्यादीच्‍या कार्यालयात येवून आरोपी रामदास नरवडे याने फिर्यादीला मारहाण केली. तसेच त्‍यांच्‍या कार्यालयातील दोन रजिस्‍टर देखील फाडली. प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात जमादार एस.ए. तुपे यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणी वेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता सचिन सूर्यवंशी आणि अनिल हिवराळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ४२७ अन्‍वये एक महिना कारावासा आणि २०० रुपये दंड, कलम ३५३ व ३३२ अन्‍वये एक वर्षे कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला दोन महिन्‍यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन सहायक निरीक्षक व्ही.ए. एमपुरे आणि सहायक फौजदार एस.बी. भेरे यांनी काम पाहिले.