अल्पवयीनवर बलात्‍कार करणारा रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा याला २० वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद ,२९ जून /प्रतिनिधी :- पो‍लिस भरतीसाठी ट्रेनिंग देतो असे सांगुन मानलेल्या बहिणीच्‍या अल्पवयीन बहिणीवर बलात्‍कार करणारा नराधम रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा (२३, रा. भावसिंगपुरा) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ६२ हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी बुधवारी दि.२९ ठोठावला. विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडापैकी २५ हजारांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून अल्पवयीन पीडितेला देण्‍याचे देखील न्‍यायालयाने आदेशात नमुद केले आहे.  

या प्रकरणात १३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, पीडितेची आई वडिलांचे निधन झाले असून मोठी बहिण पीडितेला सांभाळते. पीडितेची मोठी बहिण नर्स आहे. आरोपी हा पीडितेच्‍या मोठ्या बहिणीने मानलेला भाऊ आहे. २४ ऑगस्‍ट २०२१ रोजी रक्षा बंधन असल्याने आरोपीहा मित्रासोबत पीडितेच्‍या घरी आला तेव्‍हा दोघी बहिणी घरी होत्‍या. आरोपीला राखी बांधल्यानंतर त्‍याने ओवाळणी देण्‍यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मात्र तुला पोलिस भरतीसाठी ट्रेनिंग देईल, एक तारखेपासून ट्रेनिंग सुरु करु असे म्हणत तेथुन तो निघुन गेला. ३१ ऑगस्‍ट २०२१ रोजी पीडितेची मोठी बहिण ड्युटीला गेल्याने पीडिता ही एकटीच घरी होती. सकाळी ७ वाजेच्‍या सुमारास आरोपी हा पीडितेच्‍या घरी आला. त्‍याने झोपीत असलेल्‍या पीडितेला उठवून ट्रेनिंगसाठी चल असे म्हणाला, मात्र पीडितेने नकार दिला. त्‍यामुळे आरोपीने पीडितेच्‍या बहिणीला सांगितले, ब‍हिणीने पीडितेला ट्रेनिंगला जाण्‍यास सांगितले.

त्‍यानूसार पीडिता व आरोपी दर्गा रोडपर्यंत पायी आले. तेथे आरोपीचे दोन मित्र कारमध्‍ये होते. आरोपीने पीडितेला कारमध्‍ये बसण्‍यास सांगितले. कार बीड बायपास रोडने राजेशनगरात आली. तेथे एका दुमजली इमारतीत  आरोपीने पीडितेला नेले. तेथे एका खोलीत नेवून पीडितेला व्‍यायाम करण्‍यास सांगितला. त्‍यानंतर आरोपीने पीडितेवर बळजबरी बलात्‍कार करुन त्‍याची मोबाइल मध्‍ये व्हिडीओ रेकॉर्डिंग  केली. व कोणाला काही सांगितल्यास रेकॉर्डिंग  फेसबुकवर टाकून बदनामी करीन अशी धमकी दिली. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला दुचाकीवर घरी आणुन सोडले. त्‍यावेळी पीडितेची बहिण घरी आली होती, पीडितेने घडलेली सर्व घटना तिला सांगितली. या प्रकरणात पुंडलि‍कनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एम.एल. चव्‍हाण यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ आणि पोक्सोच्‍या कलम ४ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी २५ हजार रुपयांचा दंड, कलम ३५४ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड, कलम ३५४ (अ) आणि पोक्सोचे कलम ८ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी ५ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.