वैजापूर तालुक्यातील 31 गावे पूरप्रवण ; नदीकाठच्या 17 गावांना पुराचा धोका

वैजापूर ,१२ जून  /प्रतिनिधी :-यावर्षीही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून तालुक्यात पावसाच्या पाण्यामुळे धोका संभवणाऱ्या गावांची वर्गवारी प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 31 गावे पूरप्रवण असून नदीकाठच्या 17 गावांना पुराचा धोका संभवतो. त्यादृष्टीने प्रशासनाने तयार केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी तालुक्यात सरासरी पेक्षाही जास्त पाऊस झाला.अतिवृष्टीमुळे गोदावरी, शिवना, ढेकू व बोर या नद्यांना पूर येऊन गोदकाठच्या बाभळगांवगंगा, डोणगांव, बाबतरा, पुरणगांव आदी गावांमध्ये तसेच शिवनाकाठच्या लासुरगांव, बोरसर, परसोडा या गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. पावसाच्या पाण्यामुळे धोका संभावणाऱ्या गावांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पुराचा धोका संभवतो अशी तालुक्यातील 31 गांवे पूरप्रवण वर्गवारीत आहेत.तर ज्या गावांना नेहमीच पुराचा वेढा पडतो अशी 17 गांवे निळ्या रेषेखाली या यादीत टाकण्यात आली आहेत.तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या डोणगांव, बाबतरा, लाखगंगा, नांदूरढोक,बाभूळगांवगंगा व बाजारठाण या गावांना पुराचा वेढा बसतो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.