वैजापूर शहरात भरदिवसा घरफोडी पालिका कर्मचाऱ्यांचे 2 लाखांचे दागिन्यांची चोरी

वैजापूर ,२१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-नगरपालिका कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी एक लाख 68 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी वैजापूर शहरात घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर नगरपालिकेत लेखापाल असलेले बाळासाहेब चव्हाण हे आपल्या कुटुंबासह शहरातील संभाजीनगर भागात राहतात.पालिकेतील आपले सहकारी प्रकाश पाटील चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नात ते कुटुंबियांसह शहरातील जगदंबा लॉन्स मध्ये गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले एक लाख 68 हजार रुपये किमतीचे आठ तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.चव्हाण कुटुंबीय लग्न आटोपून दुपारी घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. 
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ताहेर पटेल,पोलीस नाईक भगवान सिंगल,पो.कॉ.ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.चोरट्यांचा छडा लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.