जनावरांच्या लंपी आजारावर उपाययोजना करण्यासंदर्भात आ.बोरणारे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

वैजापूर,१३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- सध्या संपूर्ण राज्यात जनावरांच्या लंपी स्किन आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून या आजाराचा तालुक्यात प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी मंगळवारी (ता.13) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.


तहसील कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस आ.रमेश पाटील बोरणारे, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, तहसीलदार राहूल गायकवाड, पशुसंवर्धन सहउपायुक्त डॉ. बाभूळगांवकर, तालुका कृषी अधिकारी आढाव, पशुवैधकीय अधिकारी डॉ.राठोड, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून पारस पेटारे आदी उपस्थित होते.
राज्यात सध्या जनावरांवरील लंपी स्कीन रोगाचा झपाट्याने प्रसार होत असून तालुक्यात अद्याप एकही गाय, बैल, शेळी, जनावरे बाधित नसून या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत मोठ्याप्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. कदाचित जनावरांना लंपी आजार आढळल्यास तत्काळ लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहेत त्यासाठी शासकीय डॉक्टरांची संख्या कमी असल्याने लसीकरणासाठी खासगी डॉक्टरांची देखील मदत घ्यावी अशा सूचना आमदार बोरणारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.