दौलताबाद मध्ययुगीन कालखंडातील समृद्ध शहरांपैकी एक

कोविडनंतरच्या पहिल्या दौलताबाद  हेरीटेज वॉकला चांगला प्रतिसाद

औरंगाबाद,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- दौलताबाद अर्थात देवगिरी हे शहर मध्ययुगीन कालखंडातील सर्वात समृद्ध शहरांपैकी एक होते. समकालीन प्रवाश्यांच्या लिखाणातून हे स्पष्ट होते. तत्कालीन कालखंडात बगदाद हे सर्वात सुंदर शहर मानणारे प्रवासी दौलताबादला आल्यावर याच्या प्रेमात पडले, अशी माहिती इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांनी आज दौलताबाद किल्ल्यात उपस्थित मंडळींना दिली.

अमेझिंग औरंगाबाद आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद विभाग कार्यालयातर्फे आयोजित या वॉकमध्ये शहरातील बालवृद्धांनी सहभाग नोंदवला.जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने दौलताबाद येथे दिनांक २१.११.२०२१ रोजी हेरीटेज वाँक आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेला हा वॉक दुपारी एकच्या सुमारास संपला.यावेळी डॉ. रफत कुरेशी व दुलारी कुरेशी यांनी किल्ल्याची निर्मिती, यादवकालीन स्थापत्य, कला, साहित्य, संगित, विविध कला, सौन्यामोत्याची बाजारपेठ तसेच भाषेचा इतिहास (दख्खनी उर्दू आणि मराठी) किल्ल्याची तटबंदी, किल्यावर भेट देणाऱ्या परदेशी परवाशी इब्न बतुता, फरीस्ता याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी डॉ. रफत कुरेशी यांनी मोहम्मद बिन तुघलग आणि अन्य मध्ययुगीन राजशाह्यांच्या बाबत माहिती सांगितली.

यानंतर पुरातत्त्व अधिषण डॉ. मिलनकुमार चावले यांनी उपस्थित स्वागत करून पुरातत्व चालु असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. सर्वसामान्य जनतेनेही संवर्धन कामामध्ये सहकार्य करावे स्वच्छता राखावी, पुरातत्व वास्तूभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी या विभागास सहकार्य करावे असे आवाहन केले.

डॉ. दुलारी कुरेशी यांनी दौलताबाद किल्ला आणि शहराच्याबाबत लिहिलेल्या तत्कालीन प्रवासी मंडळींच्या लिखाणाचा दाखल देत दौलताबाद बाजारात लागलेल्या दुकानांतील ढिगांनी विक्रीसाठी असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची माहिती दिली. कागदाचा कारखाना किल्ला परिसरात असल्याने त्याचा आवाज त्रासदायक होत असे. त्यामुळे कालांतराने हा कारखाना कागजीपुरा येथे हलवण्यात आला.

यानंतर श्रीकांत उमरीकर यांनी छोट्या गावामध्ये विखुरलेल्या प्राचीन मूर्ती, मंदिरे, वारवा यांच्या जतन व संरक्षणासाठी चळवळीस सहकार्य करण्याचे आव्हान केले.मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीने जनजागृती मोहिम चालविण्यात येत असल्याची माहिती दिली.दुर्लक्षित वारसा जतन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे असे श्रीकांत उमरीकर यांनी सांगितले.

हेमाडपंथी मंदिर कला, संगीत हे दौलताबादची देण

यादवांचे प्रधान म्हणून प्रसिद्ध असलेले हेमाद्री यांच्यानावे हेमाडपंथी मंदिरे आहेत. विशिष्ट प्रकारच्या या मंदिराची माहिती यावेळी देण्यात आली. मंदिरांवर कलाकुसर आणि दगडांचा विशिष्ट पद्धतीने झालेला वापर हा या मंदिरांचे वैशिष्ठ्य होय. गोपाल नायक, शारंगदेव यंच्यासारखे संगीत क्षेत्रातील महारथी देवगिरी किल्ल्याने देशाला दिलेली देण आहेत. तत्कालीन मोठे कलाकार अमीर खुसरो देखील गोपाल नायकाच्या सतत सात तास गायनवर भाळले होते, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले.

उर्दू, मराठी भाषा मूळ दक्खनेची
उर्दू ही भाषा उत्तर भारतातील आहे असे समज आहे. मात्र दौलताबाद आणि त्याचा परिसर हा उर्दू भाषेचा जनक आहे असा दावा डॉ. कुरेशी यांनी केला. दौलताबादेत जगभरातील विविध भाषा बोलणारी मंडळी मुक्कामी असे. त्यांच्या माध्यमातून जी भाषा निर्माण झाली ती उर्दू होय. हीच भाषा कालांतराने उत्तरेत गेली आणि तिथे मात्र ती अधिक सुधारित झाली. मराठी देखील दौलताबादच्या या परिसरात मोटजी झाली, असे त्या म्हणाल्या.

ऐतिहासिक स्थळे आपला वारसा: चावले
पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. मिलनकुमार चावले यांनी उपस्थित स्वागत करून पुरातत्व चालु असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. ही वारसास्थळे ही भावी पिढीसाठी जपली पाहिजेत. २०४ एकर परिसरात विस्तारलेला दौलताबाद किल्ला राखण्यासाठी केवळ ४० माणसे आहेत, त्यामुळे त्यांना खराब करू नका, असे आवाहन डॉ. मिलन कुमार चावले यांनी आज केले.

नर्मदेपासूनचा प्रदेश दौलताबादचा संरक्षक: वाघमारे

पत्रकार आदित्य  वाघमारे यांनी संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व, किल्ल्याचे स्थान याविषयी माहिती दिली. किल्ला पाहत असतांना दुलारी कुरेशी यांनी किल्ल्यातील तोफा, दरवाजे, चांदमिनार याविषयी माहिती दिली. संरक्षणाच्या दृष्टीने किल्यातील तोफा यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षक हे केवळ आज दिसणारे खंदक अंधारी नव्हेत. दक्खन आणि दौलताबाद किल्ल्याकडे येताना नर्मदा आणि तापी सारख्या मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. त्यानंतरचा किल्ल्यापर्यंतचा असलेला प्रदेश फारसा सपाट नसल्याने वाट बिकटच होती. मेंढा तोफ देशातील दुसरी सर्वात मोठी तोफ असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी सहाय्यक पुरातत्वीत डॉ. किशोर सोलापुरकर, श्री. संजय रोहनकर, डॉ. कामाजी, मयुरेश खडके, संजय चिट्टमवार, श्रीकांत उमरीकर, किरण वनगुजर, लतीफ शेख,श्री. संजय पाईराव, उमेश डोंगरे, प्रमिला कुलकर्णी, यासह 200 लोक सहभागी होते.