कुंड्या चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाई:चोरी विरुद्ध प्रशासनाने उचलले पाऊल

प्रशासकांकडून कारवाई

औरंगाबाद ,८ जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरातील एन १ सिडको सायकल ट्रॅकवर बसवण्यात आलेल्या कुंड्या चोरी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाई केली आहे. खुद्द प्रशासकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक वस्तूची चोरी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.


मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एन- १ सिडको येथील रस्त्यावर पादचारी मार्ग सह सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या सायकल ट्रॅक च्या सुशोभीकरणासाठी बाजूला कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्या चोरी करुन नेत असतानाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला मिळाले. या फोटोत चोरी करणाऱ्या व्यक्ती आणि गाडी दिसत आहे. या गाडीचा तपास केला असता फोटोमध्ये दिसणारी ही गाडी बजाज पल्सर असून सदर गाडी ही विकास थोटे या इसमाच्या नावावर नोंदणीकृत आहे. या मार्गावरील बऱ्याच कुंड्या चोरून नेल्याचे दिसून आले आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्मार्ट सिटी तर्फे संबंधित व्यक्तींवर एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. कलम ३७९ अंतर्गत संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या अशा प्रकरणांमुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे नुकसान होत आहे. सार्वजनिक वस्तू खराब करणाऱ्या किंवा चोरी करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध प्रशासन सक्तीने वागणार आहे, असे प्रशासकांनी सांगितले आहे.