सार्वजनिक आरोग्य  परीक्षेत हेराफेरी,आणखी दोन आरोपींना अटक

औरंगाबाद,३० मे /प्रतिनिधी:-

सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात येणार्‍या परीक्षेत हेराफेरी केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसानी आणखी दोन आरोपींना शनिवारी दि.२९ रात्री अटक केली. त्‍यामुळे गुन्‍ह्यातील आरोपींची संख्‍याही १३ पर्यंत पोहचली आहे.

अमोल भगवान बडुगे (२४, रा. कुर्हा (काकोडा) ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) आणि कमलसिंग लालचंद नायमने (२३, रा. जोडवाडी ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे असून त्‍यांना एक जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.यू. न्‍याहारकर यांनी रविवारी दि.३० दिले.

आरोपी बडुगे हा परिक्षार्थी होता, त्‍याचे परिक्षा केंद्र नाशिक येथे होते. आरोपी राहुल बहुरे हा बडुगे याला मोबाइलव्‍दारे उत्‍तरे पुरवीत होता. तर आरोपी नायमाने हा देखील गेवराई येथील धनेश्र्वरी कॉलेजमध्‍ये परिक्षा देणारा आरोपी मदन बहुरे याला मोबाइलव्‍दारे उत्‍तरे सांगत होता.

गेवराई तांडा येथील धनश्री महाविद्यालयात सुरु असलेल्या परिक्षेत उमेदवारांना पेपर सोडविण्यासाठी मदत करित असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. त्‍यानूसार पोलिसांनी छापा मारुन सहा आरोपींना अटक केली. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातयापूर्वी मदन बहुरे, राहुल बहुरे, फुल बेग, रमेश बमनावत, संतोष रगडे, स्वप्नील बाहेकर, अकाश नागलोत, पवन कवाळे, अ‍र्जून बिघोत, सचिन जंघाळे आणि योगेश सुलाने या ११ आरोपींना अटक करण्यात आली. तर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

 दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपी गुन्‍ह्यातील इतर आरोपींचा शोध घेवून त्‍यांना अटक करणे आहे. आरोपी राहुल बहुरे याने बडूगेला मोबाइलव्‍दारे उत्‍तरे सांगितली की, त्‍याच्‍या जागी दुसरा परिक्षार्थी बसवला याचा तपास करणे आहे. परिक्षार्थ्‍यांना उत्‍तरे सांगण्‍यासाठी आरोपी नायमाने सोबत आणखी कोण कोण हजर होते याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.