कोरोना उपचार सुविधासह औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.21:- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे समाधानकारक असून ते 76.1 टक्के इतके आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे, खाटा, ऑक्सीजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. बैठकीला आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, आ.अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) गणेश गावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असून जिल्ह्यातील गंभीर रुग्णांवर योग्य उपचार तातडीने केल्या जात आहे. त्याच सोबत या रुग्णांच्या उपचारासाठी टेलिमेडीसीन सुविधेद्वारा तज्ञांचे देखील मार्गदर्शन घेण्यात येत आहे. तसेच रुग्णवाढीच्या प्रमाणात ऑक्सीजनसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्या जात असून काही खासगी रुग्णालयांनीही आता ऑक्सीजन निर्मिती सुरु करण्याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे ऑक्सीजन निर्मितीस सुरवात केलेली आहे. तसेच खाटा वाढवण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार रुग्णालयांनी अतिरिक्त खाटा वाढवण्यास सुरुवात केली असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.तसेच कोरोना उपचारात महत्वाचे ठरणारे रेमडीसीवीर इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहणामूळेही रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक प्रमाणात सुविधा उपलब्ध होत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्ह्यात ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ मोहीमेच्या व्यापक अमंलबजावणीतून मोठ्या प्रमाणत जनजागृती आणि आरोग्य मार्गदर्शन नागरीकांना करण्यात येणार आहे. तसेच या सर्वेक्षणात आवश्यक ठिकाणी संशयित रुग्णांना योग्य उपचार सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 2306 पथके तयार करण्यात आली असून ग्रामीण भागात 1927 तर शहरी भागात 379 पथकाव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच 142 डॉक्टर संदर्भ सेवेकरीता तर 45 रुग्णवाहिका या मोहीमे अंतर्गत उपलब्ध असतील. ही मोहीम अधिक प्रमाणात यशस्वी करण्यासाठी लोप्रतिनिधींचा सहभाग मोठ्या संख्येने घेतला जाणार आहे, तरी सर्वांनी मोहीमेत सक्रिय सहभागी होत सहकार्य करण्याचे आवाहन ही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.

आ. हरिभाऊ बागडे यांनी ग्रामीण भागातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात अधिक जनजागृती करून ग्रामीण स्तरावरील यंत्रणांनी त्याबाबत कडक अंमलबजावणी करण्याची अधिक गरज असल्याचे सांगून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब रूग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिक पाठपुरावा करावा, असे श्री. बागडे यांनी सूचित केले.

आ. जैस्वाल यांनी बाजारपेठ व इतर सर्व दुकाने निश्चित करुन दिलेल्या ठराविक वेळेपर्यंत बंद करणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होत नाही, त्या ठिकाणी अधिक कडक अमंलबजावणी करावी. तसेच जाधवमंडी आणि अशा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, अंतर राखणे या नियमांचे कटाक्षाने पालन करण्यावर भर द्यावा असे सूचित केले.

आ. दानवे यांनी आयसीयु, व्हेंटीलेटर, खाटांची संख्या, ऑक्सीजन साठा वाढवणे गरजेचे असून घाटीत विनाखंडीत विद्युत पुरवठा व्यवस्था ठेवावी जेणेकरुन त्या ठिकाणी रुग्णांसाठी पुरवण्यात येणाऱा ऑक्सीजन पुरवठा विना अडथळा सुरळीतपणे होत राहील. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदवले यांनीही यावेळी उपचार सुविधा मोहीम अमंलबजावणीबाबत माहिती दिली.जिल्ह्याचा रूग्ण वाढीचा दर वाढत असून सध्या 76.1 टक्के दराने रूग्ण बरे होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर कमी करण्यात यश मिळत असून 2.77 टक्के वर मृत्यूदर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर 86999 तर ॲण्टीजन चाचण्या 251259 या प्रमाणे एकुण चाचण्या 338258 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 108 ठिकाणी 12664 आयसोलेशन बेड तर 1491 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 488 आयसीयु बेड तर 230 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *