प्लास्टिक बॉटल कारखान्यात वीजचोरी

सिडको पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद,२१ डिसेंबर /प्रतिनिधी:- मीटरमध्ये फेरफार करून प्लास्टिक बॉटल फॅक्टरीत वीजचोरी करणाऱ्या इसमावर मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्स या नावाने नारेगावातील सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये प्लास्टिक बॉटल तयार करण्याचा कारखाना आहे. येथे औद्योगिक वापरासाठी वीजजोडणी घेतलेली आहे. 17 ऑगस्ट 2021 रोजी महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे प्रधान तंत्रज्ञ सतीश दिवे हे वीजबिल वसुलीसाठी या कारखान्यात असता त्यांनी मीटरची पाहणी केली. त्यावेळी सदर ग्राहकाचा वीजवापर सुरू होता, परंतु मीटरमधील डिस्प्ले गायब असल्याचे आढळले. दिवे यांनी सहायक अभियंता श्याम मोरे यांना मोबाईलवर संपर्क साधून मीटर संशयास्पद असल्याचे कळवले. मोरे यांनी दिवे, तंत्रज्ञ विनोद सावळे, शंकर कड, इतर कंत्राटी कर्मचारी व दोन पंचांना सोबत घेऊन कारखान्यास भेट देऊन मीटरची बारकाईने पाहणी केली. त्यात स्क्रोल बटनवर टाच पिन खोचून स्क्रोल बटन दाबून ठेवण्यात आले होते. स्क्रोल बटन जोपर्यंत दबलेले आहे तोपर्यंत डिस्प्ले गायब राहायचा. त्यामुळे वीजवापराची मीटरमध्ये नोंद होत नव्हती.  नंतर महावितरणच्या प्रयोगशाळेतही मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर महावितरणने या मीटरचा वापरकर्ता हनुमान मुंडे याच्या नावाने 25 हजार 200 युनिट्सची वीजचोरी केल्याचे 2 लाख 99 हजार 458 रुपयांचे वीजबिल दिले. मात्र हे बिल न भरल्यामुळे सहायक अभियंता श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमान मुंडे याच्याविरोधात विद्युत कायदा-2003 च्या कलम 135 नुसार सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (21 डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.