हॉटेल नैवेद्यच्‍या मालकाला ४१ लाख ५ हजार रुपयांना गंडा:दोन आरोपींना पाच महिन्यांनंतर बेड्या

औरंगाबाद ,६जून /प्रतिनिधी :-कोरोना काळात मुंबईतिल जे.जे हॉस्‍पीटल येथील चार हजार लोकांना जेवण पूरविण्‍याचे कंत्राट देण्‍याचे आमिष दाखवून हॉटेल नैवेद्यच्‍या मालकाला ४१ लाख ५ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी नाशिक येथून तब्बल पाच महिन्‍यांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी सोमवार दि.६ जून रोजी दिले.संदिप बाबुलाल वाघ (४५, रा. दामोधरनगर, नाशिक) आणि स्‍वप्‍नील भरत नांद्रे (२४, रा. साईश्रध्‍दा अपार्टमेंट, दामोधरनगर, नाशिक) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात हॉटेल नैवेद्य चे भक्तबंधु रामचंद्र पाढी (५२, रा. अहिंसानगर, आकाशवाणीजवळ) यांनी फिर्याद दिली. दोघा आरोपींनी साथीदार महिलेसह पुणे येथील महाराष्‍ट्र सिव्‍हील फोर्स, आपत्ती व्‍यवस्‍थापन कार्यालयात काम करत असल्याचे सांगत, शासनात नोकरीचे ओळखपत्र, शिक्के आणि कागदपत्रे दाखवून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. तसेच आरोपी संदिप वाघ याने आपली स्‍वत:ची आर.बी केटरर्स व फुड सप्‍लायर्स या नावाने बामणवाडा अंधेरी वेस्‍ट येथे फुड सप्‍लायची फर्म असल्याचे सांगितले. त्‍या फर्मव्‍दारे संपूर्ण महाराष्‍ट्रात सरकारी कार्यालय आणि हॉस्‍पीटलच्‍या कॅन्‍टीनला फुड सप्‍लायचे टेंडर घेवूनत्‍यांना जेवणपुरविण्‍याचे काम करत असल्याची थाप फिर्यादीला मारली. फिर्यादीचा विश्‍वास बसल्याचे पाहून आरोपींनी कोरोना काळात औरंगाबाद, कोल्हापुर, नाशिक, पुणे, जालना, परभणी, सांगली, सातार्यात अशा विविध ठिकाणी तसेच मुंबईतील जे.जे. हॉस्‍पीटल मधील चार हजार लोकांना जेवण पुरविण्‍याचे काम देण्‍याचे आमिष दाखवले. त्‍यासाठी ७० ते ८० लाख रुपये डिपॉजीट म्हणुन द्यावे लागतील अशी थाप आरोपींनी मारली. त्‍यावर विश्‍वास ठेवून फिर्यादीने ४१ लाख पाच हजार रुपये आरोपींच्‍या बँक खात्‍यात वळते केले. मात्र त्‍यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने आरोपींकडे दिलेले पैसे परत करण्‍यासाठी तगादा लावला. त्‍यावर आरोपींनी फिर्यादीच्‍या कुटूंबियांना जीवे मारण्‍याची धमकी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. विशेष म्हणजे तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना गुन्‍ह्याच्‍या तपासासाठी ठाण्‍यात हजर राहण्‍याची नोटीस बजावली होती. मात्र आरोपी चौकशीसाठी हजर झाले नाही.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी आरोपींनी सरकारी नोकर असल्याचे सांगत कागदपत्रे दाखवली होती, त्‍याबाबत तपास करायाचा आहे. आरोपी स्‍वप्‍नील नांद्रे याने फिर्यादीकडून चार लाखांची रोख रक्कम घेतली होती. ती रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपींच्‍या महिला साथीदाराचा शोध घेवून तिला अटक करायची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.