पीक विम्यासाठी सुरू असलेले उपोषण उपोषणार्थींना धमकावून मोडीत काढले ;

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :- सन 2020-21 या वर्षात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे 90 टक्के नुकसान झालेले असतानाही विमा कंपनीकडुन मात्र शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.

ही भरपाई मिळावी म्हणुन राष्ट्रीय जनशक्ती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रियाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली निवृत्ती सोनवणे, अरुण गायकवाड, शेख मोजम शेख रज्जाक, हरिभाऊ मोटे, दत्तात्रय चंदने, रंगनाथ पेहरकर, आबासाहेब मतसागर, शेख शकील आदींनी येथील तहसिल कार्यालयासमोर मागील सात महिन्यांपासुन शेतकऱ्यांना सोबत घेऊन साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र या उपोषणाची प्रशासनाकडुन दखल घेतली जात नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वैजापुरच्या दोऱ्यावर येणार असल्याने तहसिलदार राहुल गायकवाड यांनी बुधवारी आंदोलकांना हे उपोषण थांबवण्यास सांगितले.‌ ‘ तुम्हाला पिक विमा मिळणार नाही, तुमचे आंदोलन मोडीत काढा, तुमचे बॅनर काढुन टाका असे तहसिलदरांनी रियाज पठाण यांना फोनवरुन कळवल्यानंतर  माणिकराव जाधव या व्यक्तीने बॅनर फाडुन टाकले, फलक काढले, कागदपत्रांची नासधुस करुन फेकुन दिले, फोटो पाडले व म्हणाला, आंदोलन बंद करा, नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करु, जेलमध्ये टाकु. अशी तक्रार आंदोलकांनी पोलिसांना दिली व कारवाई केल्याची मागणी केली.

या मुद्द्यावरुन आंदोलकांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना प्रश्न केले. यावेळी चव्हाण यांनी आंदोलकांचे प्रश्न समजाऊन घेत अशा प्रकारे आंदोलन थांबवणे उचित नसल्याचे तहसिलदारांना सुनावले. जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विम्याबाबत तहसिलदार गायकवाड व तालुका कृषि अधिकारी आढाव यांच्याकडुन माहिती घेतली. उंबरठा उत्पन्न 70 टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच निकषात बसल्यास पात्र शेतकऱ्यांना विमा मिळण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या निकष तपासल्यानंतर कारवाई करा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना केल्या. त्यामुळे या आंदोलकांनी आपले उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला. यावेळी उपविभागिय अधिकारी माणिक आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.बी.काकड उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?

सन 2020 – 21 मध्ये वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. 90 टक्के पिक हातातुन गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई दिली. मात्र विमा कंपनीकडे विमा भरुनही वैजापूर तालुक्यातील जवळपास साडे सातशे शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कारण विम्यासाठी शेतकऱ्यांनी, केंद्र शासनाने आपला हिस्सा भरला असला तरी राज्य सरकारने आपला हिस्सा न भरल्याने शेकडो शेतकरी विम्यापासुन वंचित आहेत. यावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी आहे. राज्य शासन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी अनुदान देते मग विमा कंपनीला वेगळे निकष आहेत का असा सवाल आंदोलकांनी यावेळी केला