पॅसेंजर – डेमो रेल्वेगाड्या बंद ; प्रवाशांचे हाल

लासुर – रोटेगांव रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबवा – मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेची मागणी

वैजापूर ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर्स व डेमो रेल्वेगाड्या अद्यापही सुरू न झाल्यामुळे शैक्षणिक व अन्य कामानिमित्त औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज अपडाऊन करणाऱ्या वैजापूर-लासुर परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.बंद असलेल्या या पॅसेंजर्स व डेमो रेल्वेगाड्या त्वरित सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा तसेच लासुर व रोटेगांव रेल्वेस्थानकावर सर्व गाड्या थांबविण्यात याव्यात.अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेने केली आहे.

कोरोना प्रदूर्भावानंतर हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे.शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत. प्रार्थनास्थळेही उघडण्यात आली असून वाहतूक व्यवस्था खुली झाली आहे.मात्र अद्यापही पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी असून, जिल्ह्याचे ठिकाण आहे.औद्योगिक वसाहती व पर्यटन स्थळे याठिकाणी आहेत.त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.आसपासच्या परिसरातील विद्यार्थीं शिक्षणासाठी तर कर्मचारी – कामगार हे कामानिमित्त दररोज रेल्वेने ये-जा करतात.सद्यस्थितीत औरंगाबादहून नाशिककडे शिऊरमार्गे जाणारा रस्ता त्याचप्रमाणे ए.एस.क्लबपासून लासुर मार्गे मुंबईकडे जाणारा रस्ता हे दोन्ही रस्ते खराब व खड्डयांनी ग्रासलेले असल्यामुळे दररोज औरंगाबादला शिक्षण व नोकरी निमित्ताने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी,  कर्मचारी व प्रवाशांची फार मोठी गैरसोय झाली आहे. या प्रवाशांना रस्ता मार्ग मनःस्तापाचा झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर बंद केल्या असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. लोकडाऊनच्या काळात बंद केलेल्या रेल्वेगाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने बंद केलेली पुणे पॅसेंजर व डेमो या रेल्वेगाड्या त्वरीत सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.कायमची बंद करण्यात आलेली निजामाबाद – पुणे ही रेल्वेगाडी पूर्ववत सुरू करावी,सर्व पॅसेंजर गाड्या लासुर – रोटेगांव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे  अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी व रहीम खान यांनी केली आहे.