तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्‍याच्‍या वडिलांकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्यापैकी एकाला अटक

३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

औरंगाबाद ,३० मे /प्रतिनिधी :-तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्‍याला बेदम मारहाण करुन त्‍याच्‍या वडिलांकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्यापैकी एकाला चिकलठाणा पोलिसांनी रविवारी दि.२९ रात्री अटक केली. पवन भाऊसाहेब साबळे (२५, रा. लिंगेवाडी ता. भोकरदन जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी सोमवारी दि.३० दिले.

प्रकरणात जखमी रघुनाथ सुर्यभान दांडगे (३३, रा. वरुडकाझी ता.जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीहे शेंद्रा येथे लोटस नावाचे हॉटेल चालवतात. हॉटेवर काम करणार्या गजानन जाधव (रा. भोकरदन) याने साथीदार बाळु आणि भाऊसाहे‍ब साबळे (रा. लिंगेवाडी ता. भोकरदन) यांच्‍या साथीने फिर्यादीचे चारचाकीतून (क्रं. एमएच-०४-डीबी-०१७८) अपहरण करुन लोखंडी रॉड आणि दगडाने बेदम मारहाण केली. व फिर्यादीच्‍या वडीलांकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास मुलाची किडनी विकून टाकू अशी धमकी दिली. दोन तासांनी आरोपींनी पुन्‍हा फिर्यादीच्‍या वडीलांना फोन लावला,त्‍यावेळी त्‍यांनी दहा लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले; त्‍यावर आरोपींनी भोकरदन येथे पैसे घेवून येण्‍याचे सांगितले. दरम्यान फिर्यादी आरोपींच्‍या मारहाणीत जखमी झाल्याने त्‍याने माझ्याकडील सहा हजार रुपये आणि मोबाइल घ्‍या, माझे वडील दहा लाख रुपये आणुन देतील असे म्हणला. मात्र फिर्यादीच्‍या डोक्यात रक्तस्‍त्राव होत असल्याने आरोपींनी त्‍याला भोकरदन येथील सरकरी रुग्णालयात दाखल केले व आरोपींनी तेथून पळ काढला. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. आरोपींचा गुन्‍हा करण्‍यामागे नेमका उद्देश काय होता, आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत. आरोपी हा गुन्‍हा घडल्यापासून पसार होता, त्‍याला पसार होण्‍यास कोणी मदत केली याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.