वैजापूर येथे अतिवृष्टी व मान्सूनपूर्व तयारी संदर्भात आ.बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक

वैजापूर ,३० मे /प्रतिनिधी :-पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्यामुळे वैजापुर-गंगापूर मतदार संघातील संभाव्य नैसगिर्क आपत्ती, पुरपरिस्थिती, चक्रीवादळ, अतिवृष्टी व मान्सून पूर्व तयारी 2022 बाबत आढावा बैठक आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी येथील पंचायत समिती सभागृहात झाली.
वैजापुर गंगापूर मतदार संघात गोदावरी, शिवना, ढेकू, नारंगी-सारंगी, बोर नदी अश्या छोट्या – मोठ्या नद्या असून अतिवृष्टीमुळे नदीजवळील गावांमध्ये मान्सूनच्या कालावधीत सर्तकता बाळगणे आवश्यक आहे. त्याकरीता संबंधित विभागांनी आराखडा तयार करुन त्याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे, वनविभाग, महसूल, कृषि विभाग, महावितरण या विभागांनी मान्सूनच्या पूर्वी आपल्या विभागांशी संबंधित कामे पूर्ण करावीत. आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे. असे निर्देश आ.बोरणारे यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत  दिले.
पाटबंधारे विभागाने धरणांची बांधकाम तपासणी करुन धरण दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. सार्वजनिक बांधकाम व जि.प. बांधकाम विभागाने नदीवरील छोटे पूल नादुरुस्त असल्यास त्यांची दुरुस्तीही करुन घ्यावी तसेच सर्व रस्ते व पुलांची पाहणी करुन दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.
नदी काठच्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी शोध आणि बचाव कार्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे. पूर परिस्थितीमध्ये स्थलांकरीत करण्यात येणाऱ्या नागरिकांकरीता तात्पुरते निवारा केंद्र उभारणीसाठी संबंधित नगरपरिषद व तहसीलदार यांनी जागा निश्चित करुन सदर ठिकाणी नागरिकांना मुलभूत सोयी उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. त्याचबरोबर (NDRF) एनडीआरएफच्या पथकाच्या संपर्कात राहून उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी   (NDRF) एनडीआरएफची पथके ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणी पोहोचवता यावी, आवश्यकता भासल्यास खासगी बोटी व त्यांचे चालक यांची फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सूचना मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना दिल्या.
महावितरण विभागाने मान्सून काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, ग्रामीण भागातील व शहरातील लाईनच्या कडेला असलेल्या झाडाची छाटणी करावी, नादुरूस्त ट्रान्सफार्मर दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना आमदार साहेब यांनी संबंधित विभागांना दिल्या. 
तसेच बैठकीच्या शेवटी (NDRF) एनडीआरएफ बचाव पथक यांनी आणलेल्या स्पीड बोट, कटर मशिन, गळ, कुर्हाड, दोरी व इतर बचाव साहित्याची देखील पाहणी केली.
या बैठकीला तहसीलदार राहुल गायकवाड, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, गटविकास अधिकारी कैलास जाधव, नगरपालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, तालुका कृषी अधिकारी आढाव , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदुरकर साहेब,  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बिडवे , नगरसेवक प्रकाश चव्हाण, नगरसेवक पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, सकाहरी बर्डे, उपतालुकाप्रमुख मोहनराव साळुंके, महेश पाटील बुनगे, सिताराम पाटील भराडे, गोकुळ पाटील आहेर, युवासेना जिल्हा समन्वय अमीर अली, युवासेनेचे तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड,पंचायत समिती सदस्य रविंद्र कसबे, विनायक गाढे, माजी उपसभापती सुनिल कदम, राजेंद्र पाटील चव्हाण यांच्यासह  महावितरण, वनविभाग, जलसंधारण, कृषि विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभाग आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.