कोरोना काळातील आव्हानात्मक दंतोपचार!

डॉ. शिरीष खेडगीकर

कोरोना काळात जंतूसंसर्गबाधित रूग्णांवरील उपचारांप्रमाणेच, बाधित नसलेल्या किंवा बाधित झाल्याची लक्षणे दिसत नसलेल्या ‘कॅरियर’ रूग्णांवरील दंतोपचार मोठे आव्हानात्मक (चॅलेंजिंग) झाले आहे. दंतोपचारामदम्यान निर्माण होणारे ‘एअरोसोल्स’ आणि ‘स्प्लॅटर’ यामध्ये लाळेचे प्रमाण जास्त असते. दंतवैद्याकडून वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमुळे लाळेच्या बारिक थेंबापासून अगदी मध्यम आकाराचे तुषार किंवा क्वचिततप्रसंगी थुंकीयुक्त आणि लाळयुक्त फवारे हवेमध्ये उडतात. बाह्य लक्षणे न दिसणाऱ्या परंतु कोविड-19 विषाणूव्दारे बाधित झालेल्या रूग्णावर उपचार करताना अशा फवाऱ्यांमधून विषाणू सर्वदूर पसरण्याचा आणि परिसरातील अन्य निरोगी व्यक्तिंना बाधित करण्याचा धोका असतो. इतकेच नव्हे तर, दंतोपचार करताना दंतवैद्यास रूग्णाच्या अगदी तोंडाजवळ जाऊन उपचार करणे आवश्यक असल्यामुळे लाळेच्या संपर्कामुळे आणि बाधित रूग्णाच्या श्वासोच्छवासाव्दारे किंवा शिंकेव्दारे उपचार करणाऱ्या दंतवैद्यास विषाणू प्रादुर्भाव होण्याचा अधिक धोका असतो. वाहक (कॅरियर) रूग्णांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक रूग्ण हा ‘कॅरियर’च आहे, असे समजून पुरेशी सावधगिरी बाळगून आणि खबरदारी घेऊनच दंतोपचार करणे हितावह ठरते. 19 मे 2020 रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दंतवैद्यांसाठी मार्गदर्शक नियमावलीच जाहीर केली. त्या नियमावलीचा गोषवारा दंतरूग्णानीही जरूर नजरेखालून घालावा. त्यासाठी mohfw.gov.in/pdf/Dental Advisory या संकेतस्थळावरील माहिती वाचावी. त्यामध्ये या विषाणू संसर्ग काळात फक्त आकस्मिक आणि अत्यावश्यक तसेच अत्यंत तातडीचे ‘इमर्जन्सी’ उपचार करण्याचा सल्ला दंतवैद्यांना देण्यात आला आहे. दातांच्या किडीमुळे किंवा दाताला झालेल्या दुखापतीमुळे जंतूप्रादुर्भाव होऊन सूज आलेली असताना वेळीच उपचार झाले नाहीत तर श्वासनलिकेवर दाब पडून श्वसन मार्गात अडथळा निर्माण होतो. ते प्राणघातक ठरू शकते. अपघातामुळे किंवा मारहाणीमुळे जबड्यांची हाडे किंवा दात तुटतात. रक्तस्त्राव थांबवणे यावेळी जरूरीचे असते. तसेच किडलेल्या दातांच्या असह्य वेदना अनेकदा रूग्णाला (आणि त्याच्या कुटुंबियांनाही) त्रस्त करतात. या सर्व केसेसमध्ये स्वत:च्या आणि रूग्णाच्या संरक्षणाची सर्व साधने योग्य प्रकारे वापरून दंतोपचार करणे आवश्यक असते. हृदयश्वसनक्रिया झालेल्या, मधुमेह असलेल्या, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, कर्करोगासाठी किरणोपचार घेत असलेल्या रूग्णांवरील उपचारादरम्यान तसेच गरोदर महिला, लहान बालके आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रूग्णांसंदर्भात उपचारादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश आहेत. दंत चिकित्सालयात पुरेशी हवा असावी, ती खेळती असावी, वातानूकुलन यंत्रणा शक्यतो बंद असावी व उपचाराच्या वेळी सिलींग फॅनसुद्धा बंद असावा. प्रतीक्षागृहात रूग्णांची गर्दी वाढू नये यासाठी पूर्वसूचना देऊन, अपॉइंटमेंट घेऊन ठराविक वेळी आलेल्या रूगणांवरच शक्यतो उपचार करावेत. तेथील रूग्णांनी पुरेसे अंतर ठेवून बसणे, खोकला किंवा शिंक आल्यानंतर काळजी घेणे. हातांची स्वच्छता ठेवणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबींचे पालन करणे इष्ट. तसेच उपचाराची फी शक्तो ‘कॅशलेस’ पद्धतीनेच देण्यात यावी. दंतवैद्यांनी पी.पी.इ. किट घालून उपचार करताना सदर किटस्‍ घालण्याची व काढण्याची सुयोग्य पद्धत (डोनिंग आणि डॉफिंग) अवलंबणे श्रेयस्कर. रूग्णांच्या तोंडामध्ये वापरली जाणारी उपकरणे व डेंटल चेअर युनिटस्‍च्या निर्जंतुकीकरणाप्रमाणेच ‘फ्युमिगेशन’ व्दारे संपूर्ण ऑपरेटरीचे निर्जंतुकीकरण विविध विषाणूनाशक आणि विषाणूरोधक रसायनांचा वापर करून केले पाहिजे. उपचारानंतर निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची (बायोमेडिकल वेस्ट) विल्हेवाट सुयोग्य प्रकारे लावली पाहिजे. दंतवैद्यांप्रमाणेच त्याला सहाय्य करणाऱ्या परिचारिका किंवा तत्सम कर्मचारी यांनीसुद्धा कोविड-19 विषाणू प्रसार प्रतिबंधक उपायांची माहिती घेऊन पुरेशी खबरदारी घेणे जरूरीचे आहे.

(लेखक हे सहयोगी प्राध्यापक म्हणून  शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, घाटी, औरंगाबाद येथे कार्यरत . संपर्क क्र. 9850055445)