पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण:प्रहार संघटनेच्‍या दोन कार्यकर्त्‍यांना प्रत्‍येकी एक वर्षे सक्तमजुरी

प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,२७ मे /प्रतिनिधी :- कर्तव्‍यावरील पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बघून घेण्याची धमकी देणाऱ्या  प्रहार संघटनेच्‍या दोन कार्यकर्त्‍यांना प्रत्‍येकी एक वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलामांखाली प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एम. सुंदाळे यांनी शुक्रवारी दि.२७ ठोठावली. रऊफ पटेल आणि कुणाल राऊत अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात तत्कालीन हवालदार शिरीष गोविंदराव भालेराव यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २९ ऑक्‍टोबर २०१८ रोजी फिर्यादी हे ट्रनिंगसाठी मुख्‍यालयात हजर होते. त्‍यावेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक उदार यांनी फोन करुन आरोपी रऊफ पटेल आणि कुणाल राऊत हे दोघे विभागीय आयुक्त यांना त्‍यांच्‍या कार्यालयात जावून चोळी व बांगड्या देणार असल्याने त्‍यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेवून त्‍याप्रमाणे कारवाई करा असे सांगितले. आरोपी हे जिल्हा परिषदेत असल्याने फिर्यादी त्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्‍यासाठी दुपारी सव्‍वाबारा वाजेच्‍यासुमारास जिल्हा परिषद कार्यालयातील कॅन्‍टीन जवळ गेले. त्‍यांनी आरोपींनी आपली ओळख सांगुन त्‍यांची चौकशी केली असता, तु कोण, तुला काय करायचे असे म्हणुन आरोपींनी त्‍यांच्‍यासोबत असभ्‍य वर्तन करुन आरोपी रऊफ पटेल याने त्‍यांची गच्‍ची व कॉलर धरुन धक्काबुक्की केली. आणि तुम्हाला काय करायचे ते करुन घ्‍या, आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही असे म्हणत लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. त्‍याचवेळी पथकासह तेथे आलेल्या तत्कालीन सहायक निरीक्षक जारवाल यांनी दोघा आरोपींना पकडून गाडीत बसवले असता आरोपींनी आम्ही प्रहार संघटनेचे आणि आरटीआयचे कार्यकर्ते आहोत, तुम्हाला बघुन घेवू अशी धमकी दिली. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता बी.एन. आढावे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्‍ही बाजुंच्‍या  युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी रऊफ पटेल आणि कुणाल राऊत या दोघांना दोषी ठरवून भादंवी कलम ३५४ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी पाच हजार रुपये दंड आणि कलम ३३२ अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.