ऊस तोडणीला टाळाटाळ:शेतकरी पती –पत्नीची विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जालना ,२७ मे /प्रतिनिधी :- साखर कारखाना ऊस तोडणी करायला टाळाटाळ करत असल्याने घनसावंगी तालुक्यातील भोगाव गावच्या शेतकरी पती – पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.27) रोजी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या शेतकरी दांपत्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला . 

घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी  सुभाष सराटे आणि मीरा सराटे यांचा ऊस समर्थ साखर कारखान्याने न्यावा यासाठी सातत्याने कारखान्यावर चकरा मारल्या मात्र बारा महीन्याहून अधिक कालावधी झाल्यानंतर ऊस तोड मिळाली नाही.दिनांक 23 मे रोजी सराटे दांपत्याने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले यावेळी समर्थ  कारखान्याच्या वतीने सराटे यांना दोन दिवसांत तोड देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

———————————–

दरम्यान आठ दिवस उलटून गेल्यावर ऊस तोड येईल अशी वाट बघतोय कारखान्यातील ठेकेदार लाच मागतात भयंकर मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न केला.

-सुभाष सराटे

—————————————–

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सराटे पती – पत्नीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला  त्यांचा 8 एकर ऊस तोडणी अभावी उभा आहे. बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या करूनही साखर कारखाना ऊस तोड करायला तयार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत सय्यद हे घटनास्थळी होते  त्यांनी सराटे यांना ताब्यात घेतले.. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मझहर, तालुका पो. ठाण्याचे सहा.पो. निरि. वडते,गांगे, जिल्हा विशेष शाखेचे पो. हेडकाँ. शौकत सय्यद, शिवा चेके,निकम, कदीमचे पोलीस अंमलदार रामेश्वर राऊत, पोलीस अमलदार संदीप पवार,पोलीस अमलदार राहुल जंगले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती-पत्नीला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कीटकनाशकाची बाटली हिसकावून घेतल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. दरम्यान सराटे पती – पत्नीवर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जामीनावर त्यांची मुक्तता झाली आहे.