बोगस रूग्ण मेल्ट्रॉन कोविड सेंटर भरती केल्याप्रकरणी एका डॉक्‍टरसह तिघा आरोपींना बेड्या

औरंगाबाद ,१८ मे /प्रतिनिधी :-कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांच्या जागी बोगस रूग्ण मेल्ट्रॉन कोविड सेंटर भरती केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी तब्बल सात महिन्‍यांनी एका डॉक्‍टरसह तिघा आरोपींना मंगळवारी दि.१७ रात्री बेड्या ठोकल्या.

डॉ. लोकेश्र्वर सदाशिव साबळे (३६, रा. सहकारनगर, लोणार जि. बुलढाणा), विजय गुलाबराव मापारी (२८, रा. शिवाजीनगर, लोणार जि. बुलढाणा) आणि गगण भिमराव पगारे (२७, रा. कबीरनगर, मिलींदनगर, उस्‍मानपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींना गुरुवार दि.१९ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी बुधवारी दि.१८ दिले.

सिद्धार्थ गार्डन येथे १३ नोव्हेंबर रोजी दोन तरूणांना करोना पॉझिटिव्ह असल्याचे माहिती समोर आली होती. या प्रकरणी गगन भिमराव पगारे आणि गौरव गोविंद काथार या दोघांना मेल्ट्रॉनमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र दोन जणांच्या मध्यस्थीने गगण आणि गौरव यांच्या जागेवर अक्षय आणि अमोल या दोघांना उपचारासाठी पाठविले. या दोघांनी दोन दिवस उपचार घेतला. त्यानंतर मात्र, कोविड सेंटरमधुन बाहेर जाण्यासाठी तगादा लावला. दोन्ही तरूणांच्या संशयीत वागण्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. या दोन्ही तरूणांनी दहा हजार रूपयांमध्ये दहा दिवसांसाठी गौरव आणि गगण यांच्या नावावर मेल्ट्रॉनमध्ये राहण्यासाठी आल्याचा खुलासा केला. प्रकरणात मेल्‍ट्रॉन कोवीड इंचार्ज डॉ. वैशाली मूदगडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्यात यापूर्वी अलोक राठोड (२०), अतुल सदावर्ते आणि गौरव काथार या तिघांना अटक करण्‍यात आली होती.

तिघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपी गगण पगारे आणि गौरव काथार यांनी डॉ. लोकेश्र्वर साबळे याच्‍याकडून काढलेली इन्‍शुरन्‍स पॉलिसीचे कागदपत्र जप्‍त करायची आहे. आरोपी डॉ. साबळेने आणखी किती व्‍यक्तींच्‍या इन्‍शुरन्‍स पॉलिसी काढल्या आहेत याचा तपास तसेच गुन्‍ह्यातील पसार आरोपी सागर साबळे आणि सचिन सिनगारे या दोघांना अटक करायची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी न्‍यायालयाकडे केली.