राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज कार्यक्रम,अभिनेत्री चिन्मयी सुमीत,अभिनेता मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती
औरंगाबाद,२४ जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम आदींची उपस्थिती होती.
श्री. देशपांडे म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात.

यंदाच्या या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री चिन्मयी सुमीत, अभिनेता मकरंद अनासपुरे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीसहून अधिक अभ्यासकांचे लेख आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचे, टेलिग्राम बॉटचे लोकार्पणही होणार आहे. नवमतदारांना मतदार ओळखपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यात मतदार नोंदणी, मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि समाज माध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांची नावे घोषित केली जाणार आहेत. शिवाय, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदान, लोकशाही या विषयावर घेतलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट, लोकशाही भोंडला आणि लोकशाही दीपावली (आकाश कंदील आणि रांगोळी) या ऑनलाइन राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांची नावे घोषित केली जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय चित्रकला, लघुपट, गाणे, मीम, घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार आहे. सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी मतदान करणे आवश्यक असल्यासंबंधी पथनाट्याचे सादरीकरणही होणार असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.